अहिल्यानगर : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी सर्वांच्या सहकार्याने या परिस्थितीवर मात करून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करू, असा विश्वास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी व्यक्त केला.दिवाळी सणानिमित्त सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात बिपीनराव कोल्हे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे कार्यकारी संचालक हनुमंत करवर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
बिपीन कोल्हे म्हणाले की, चालू गळीत हंगामात अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यासमोरील विविध अडचणींवर मात केली जाईल. निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधितांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ‘माझा कारखाना, माझी जबाबदारी’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सत्कार करण्याऐवजी गरजूंना मदत करावी, असे आवाहन आपण केले होते. या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, त्यातून ६५ पोती धान्य जमा झाले आहे. ही बाब समाधानकारक असल्याचेही बिपीन कोल्हे यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे रोखपाल आर. टी. गवारे यांचा बक्षीस देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुणराव येवले, विश्वासराव महाले, शिवाजीराव वक्ते, संजय होन, मोहनराव वाबळे, निवृत्ती कोळपे, सोपानराव पानगव्हाणे, पांडुरंगशास्त्री शिंदे, सुनील चव्हाण, कैलास माळी, शरद थोरात, केशवराव भवर, डॉ. गुलाबराव वरकड, अशोकराव औताडे, दगुराव चौधरी, कामगार नेते मनोहर शिंदे, मच्छिंद्र लोणारी, संचालक त्र्यंबकराव सरोदे, विलासराव वाबळे, बाळासाहेब वक्ते यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सचिव तुळशीराम कानवडे यांनी आभार मानले.


















