कर्नाटक : बेळगावमध्ये पुन्हा ऊसदराचा मुद्दा तापला, ३८०० रुपये उचल देण्याची रयत संघाची मागणी

बेळगाव : ऊसदर आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून प्रतिटन ३६०० रुपये दर मान्य करण्यात आला होता. मात्र, काही साखर कारखान्यांनी चार हजार रुपये दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल होत असल्याचा आरोप कर्नाटक राज्य रयत संघ व हरितसेनेचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी केला. साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन पहिली उचल ३८०० रुपये जाहीर करावी; अन्यथा मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. कन्नड साहित्य भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी साखर कारखाना व्यवस्थापनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत साउथ इंडिया शुगर मिल असोसिएशनची भूमिका शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला.

पुजारी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कष्टाचा योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ होत आहे. कारखाने शेतकऱ्यांच्या उसापासून मोठा नफा मिळवत असताना त्यांना योग्य मोबदला देण्यास टाळाटाळ करणे अन्यायकारक आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि उत्पादन खर्च लक्षात घेऊन कारखानदारांनी न्याय्य दर जाहीर करावा. साऊथ इंडिया शुगर मिल असोसिएशनने मुख्यमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची दिशाभूल केली आहे. ऊस उत्पादकांना पहिली उचल प्रतिटन ३८०० रुपये द्यावी. नंतर साखरेच्या किमान विक्री किमतीत (एमएसपी) वाढ झाल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त दर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कारखान्यांना घेराओ घालण्यात येईल, असा इशाराही पुजारी यांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here