कर्नाटक : ऊसदराच्या प्रश्नावर तातडीने संयुक्त बैठक बोलवा; ऊस उत्पादक समितीचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन

बेळगाव : कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य आणि एकसमान ऊसदर मिळावा, यासाठी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणी कर्नाटक ऊस उत्पादक समितीने केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. १३) समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक आयुक्तांना निवेदन सादर केले.

२०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी ऊसदर निश्चितीवरून सुरू असलेला संघर्ष राजकीय डावपेचांमध्ये अडकत असल्याचा आरोप समितीने केला आहे. साखर कारखानदारांकडून जाहीर करण्यात आलेले ऊसदर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अव्यवहार्य असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कीटकनाशके, बियाणे, खते, डिझेल, शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री आणि मजुरीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या जाहीर करण्यात येणारे दर उत्पादन खर्चाची भरपाई करण्यासाठीही अपुरे पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

‘शुगर कंट्रोल अॅक्ट १९६६’ नुसार उसाला शास्त्रीय आधारावर एकसमान दर निश्चित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि तमिळनाडू या शेजारील राज्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर रक्कम जाहीर केली आहे. त्याच धर्तीवर कर्नाटकातील ऊस उत्पादकांनाही न्याय मिळावा, यासाठी शेतकरी नेते आणि साखर कारखानदारांची संयुक्त बैठक घेऊन चर्चेतून तोडगा काढावा, अशी भूमिका समितीने मांडली आहे.

मागील वर्षाच्या साखर उताऱ्यावर (रिकव्हरी रेट) आधारित ऊसदर निश्चित करण्यास समितीने विरोध दर्शविला आहे. एफआरपी अर्थात रास्त व किफायतशीर दरासोबत अतिरिक्त प्रोत्साहनपर रक्कम देऊन ‘एक्स-फील्ड’ मॉडेलनुसार ऊसदर निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच डॉ. सी. रंगराजन समितीच्या अहवालानुसार साखर उद्योगातील उपउत्पादनांमधून मिळणाऱ्या नफ्याचे ७०:३० या प्रमाणात महसूल वाटप सूत्रानुसार वितरण करण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी भारतीय कृषक समाजाचे सिद्धगौडा मोदगी, श्रीकांत जोशी, भीमेश बनशंकरी, मल्लिकार्जुन मायप्पगोळ, यल्लाप्पा बळगार यांच्यासह समितीचे अन्य पदाधिकारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ऊस उतारा आणि वजन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी

ऊस उत्पादकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये, यासाठी साखर उतारा आणि वजन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणीही समितीने केली आहे. त्यासाठी दरवर्षी केन सॅम्पलर मशीनचा वापर आणि ऑडिट ट्रेल प्रक्रिया राबविण्यात यावी. तसेच बारकोडयुक्त मानवरहित वजनकाटा प्रणाली लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय ऊस वाहतुकीतील गैरप्रकार आणि पक्षपातीपणा रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनाद्वारे प्रादेशिक आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here