पुणे : खेड तालुक्यातील पिंपळगाव येथे ऊसतोड कामगारावर जीवघेणा हल्ला करणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या मोहिमेत या बिबट्याला पकडण्यात यश आले. जेरबंद बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
उपवनसंरक्षक जुन्नर, सहायक वनसंरक्षक जुन्नर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण यांच्या मार्गदर्शनाखाली मालकी क्षेत्रात पिंजरा लावण्यात आला होता. या पिंजऱ्यात अखेर हल्लेखोर बिबट्या अडकला.पिंपळगाव तर्फे चाकण येथील सरपंच विलासराव नाथू काकडे यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू होते. यावेळी अंबरसिंह महादू चव्हाण हे ऊसतोड कामगार काम करत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात चव्हाण जखमी झाले.
दरम्यान, शेतात उपस्थित असलेल्या अन्य ऊसतोड कामगारांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याने जखमी कामगाराला सोडून तेथून पळ काढला. घटनेनंतर जखमी अंबरसिंह चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत आळंदीचे वनपाल आनंदकुमार इंदलकर, वनरक्षक दीपाली रावते, वनरक्षक नवनाथ पगडे, वनसेवक अजय कोळेकर, धनराज तोंडे, दौलत वाडेकर, किसन पारधी आणि राघू ठाकर यांच्यासह इतर वनकर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


















