कोल्हापूर : चंदगडमध्ये खासगी काट्यांवर ऊस वजन करण्याचे ‘स्वाभिमानी’चे शेतकऱ्यांना आवाहन

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे यंदाचा दर निश्चित झाला. वाढते खतांचे दर, मजुरी आणि मशागतीचा खर्च पाहता शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळणे आवश्यक आहे. दरासाठी दरवर्षी संघर्ष करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांनी आता वजनाबाबतही सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत जनजागृतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यात प्रमुख ठिकाणी फलक लावले आहेत. जादा ऊस दराच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांकडून वजनात काटछाट होण्याची शक्यता असल्यामुळे कारखान्यांवर ऊस पाठविण्यापूर्वी खासगी वजन काट्यावर वजन करून घेण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले आहे.

यंदाच्या ऊसदराचा तिढा लवकर सुटला. तीन टप्प्यात शेतकऱ्यांना एकूण ४२०० रुपये प्रतिटन दर निश्चित झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कारखान्यांच्या वजन काट्यांवर गडबड होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. याबाबत स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांना खासगी काट्यांवर ऊस वजन करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे वजनातील संभाव्य तफावत लक्षात येऊन फसवणूक टाळता येईल, असे संघटनेने म्हटले आहे. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील म्हणाले की, खासगी वजनकाटाधारक तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी अल्पदरामध्ये उसाचे वजन करून द्यावे, यासाठी तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. शेतकरी हिताचा विचार करून वजन काटाधारकांनी सहकार्य करावे. दरम्यान, गेल्यावर्षीच्या अंतिम ऊस दरासाठी विविध शेतकरी संघटनांनी प्रयत्न केले. यातून तालुक्यतील शेतकऱ्यांचा सुमारे १५ कोटी रुपयांचा लाभ झााल्याचा दावा करण्यात येत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here