बेळगाव : यंदा पावसाच्या कमतरतेमुळे निर्माण झालेला भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ऊस उत्पादनात ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. परिणामी, साखर कारखाने आपल्या गाळप क्षमतेनुसार पुरेसा ऊस मिळवण्यासाठी आता प्रतिटन ४,००० ते ४,२०० रुपयांपर्यंत दर देत आहेत. विशेषतः कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागात ऊस खरेदीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी अधिक दराच्या आमिषाला बळी पडून आपला ऊस महाराष्ट्रातील कारखान्यांना दिल्यास, स्थानिक कारखान्यांसमोर संकट निर्माण होऊ शकते, अशी भीती असल्याने एक आठवड्यापूर्वी उसाला प्रतिटन ३,६०० देण्यासही कचरणारे साखर कारखाने आता जास्त दर देण्याची स्पर्धा करीत असल्याचे चित्र आहे.
यंदाच्या दुष्काळामुळे बहुतांश भागांत ऊस पिके वाळून गेली आहेत, परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे. उसाची संभाव्य टंचाई लक्षात घेता, कारखान्यांनी खरेदीसाठी अधिक दराचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील बहुतांश ऊस उत्पादक शेतकरी ऊस अधिक दर देणाऱ्या कारखान्यांना विकत आहेत. दुष्काळामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कारखान्यांतील तीव्र स्पर्धेमुळे उसाचा दर प्रतिटन ४,००० च्या वर गेला आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी म्हणाले की, ऊस खराब होण्याची भीती होती. यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून ३,६०० रुपयांचा दर स्वीकारला आहे, हिवाळी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सरकारकडे प्रतिटन १,००० रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची मागणी करणार आहोत.


















