धाराशिव : नॅचरल शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीजने दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. समुहाच्यावतीने कारखाना परिसरात शेतकरी मेळावा घेण्यात आला. यावेळी मुरघास निर्मितीसाठी २५ टक्के अनुदान, ठिबक सिंचनासाठी ९० टक्के अर्थसाहाय्य आणि जलतारा योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्याच्या महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे होते. कृषिरत्न डॉ. संजीव माने आणि पशुआहार तज्ज्ञ डॉ. प्रफुल्लकुमार पाटील प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी ऊस खोडवा व्यवस्थापन, बेणे मळा संगोपन तसेच पाचट व बगॅसपासून कमी खर्चात उत्कृष्ट मुरघास निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नॅचरल शुगर सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून खोडवा ऊस जोपासावा, असे आवाहन बी. बी. ठोंबरे यांनी केले. शेतकऱ्यांना नॉन-आयएसआय ठिबक संचासाठी केवळ १० टक्के रक्कम भरावी लागणार असून २५ टक्के अनुदान कारखान्याकडून, तर ६५ टक्के कर्ज श्री साई पतसंस्थेमार्फत दिले जाणार आहे. खोडव्यासाठी पाणी धारण क्षमता असलेले झेंबा खत तसेच कारखान्यातील उत्पादित खते उधारीवर उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. कारखान्यामार्फत जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येणार असून जलतारा योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी केले. डॉ. संजीव माने आणि डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रवर्तक श्रीपाद ठोंबरे यांनी आभार मानले.


















