सातारा : जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना पहिली उचल प्रतिटन ३८०० रुपये देण्याची भूमिका जाहीर केली असली, तरी शेतकरी संघटनांनी हा दर अमान्य केला आहे. कोल्हापूर पॅटर्ननुसार प्रतिटन ३९०० रुपये अधिक १०० रुपये असा दर मिळावा, या मागणीवर संघटना ठाम आहेत. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार संघटनांनी केला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या ऊसदराच्या पत्राची शेतकरी संघटनांनी होळी करून शहापूर फाटा, शिवथर आणि नवारस्ता येथे आंदोलन केले.
जिल्ह्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स, अजिंक्यतारा, कृष्णा सहकारी साखर कारखाना, जयवंत शुगर्स, सह्याद्री सहकारी साखर कारखाना, श्री दत्त इंडिया आणि शिवनेरी शुगर्स या सात कारखान्यांनी पहिली उचल प्रतिटन ३८०० रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भातील पत्र जिल्हा प्रशासनाने शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत आंदोलन अधिक तीव्र केले आहे.
शहापूर फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, पंचायत समिती सदस्य संग्राम पवार, किसान काँग्रेसचे वसीम इनामदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाने दिलेल्या पत्राची होळी केली. शिवथर येथे संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय साबळे आणि रयत क्रांती संघटनेचे प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तर नवारस्ता येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या वतीने चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, सोमवारपासून कृष्णा, रयत, सह्याद्री आणि जयवंत शुगर्ससह विविध कारखान्यांच्या प्रवेशद्वारांवर ऊसतोड आणि वाहतूक बंद आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. जरंडेश्वर कारखान्यासमोरील आंदोलनही सुरूच असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिली.
कारखान्यांच्या प्रवेशद्वारांवर ऊसतोड बंद आंदोलन
कोल्हापूर पॅटर्ननुसार ऊसदर मिळावा, या मागणीसाठी सोमवारपासून तीन कारखान्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काटा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. कृष्णा आणि रयत कारखान्यांवर देवानंद पाटील, बापूराव साळुंखे आणि रामभाऊ साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड व वाहतूक बेमुदत बंद करून रास्ता रोको करण्यात येणार आहे.
सह्याद्री कारखान्यावर तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली, तर जयवंत शुगर्स येथे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, विक्रमसिंह कदम, यशवंत गोरे, संजय खंडाईत, संतोष ढाणे, अधिक शिंदे, दत्तात्रय येटणे आणि दत्तात्रय शेलार यांच्या उपस्थितीत आंदोलन होणार आहे. या आंदोलनात परिसरातील हजारो शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.
जरंडेश्वर कारखान्याची ऊस वाहतूक दुसऱ्या दिवशीही रोखली
ऊसदर जाहीर न केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिलची ऊस वाहतूक रोखली आहे. सुरू झालेले हे आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम होते. कारखान्याचे सचिव संदीप सावंत यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मंगळवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, कारखाना व्यवस्थापनाने आंदोलनस्थळीच लेखी स्वरूपात ऊसदर जाहीर केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली.
ऊस वाहतूक रोखल्यामुळे जरंडेश्वर कारखान्याकडे येणाऱ्या चारही मार्गांवर उसाने भरलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कारखाना व्यवस्थापनाने यापूर्वी तीन वेळा दर जाहीर करण्याचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता केली नसल्याने शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे लेखी स्वरूपात दर जाहीर होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांनी स्पष्ट केले.या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, दिनेश बर्गे, वैभव जगदाळे, सुनील वाघ, प्रवीण जगदाळे, विक्रम जगदाळे, पंडित झांजुणे, संजय साळुंखे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
ऊसदराच्या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी उद्या बैठक
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटत आला, तरी जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे कारखान्यांच्या गाळपावरही परिणाम होत आहे. सात कारखान्यांनी प्रतिटन ३८०० रुपये दर जाहीर केला असला, तरी शेतकरी संघटना ३९०० रुपये अधिक १०० रुपये या सूत्रावर ठाम आहेत.या पार्श्वभूमीवर ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतून मार्ग निघणार का आणि शेतकरी संघटना आपले आंदोलन मागे घेणार का, याकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















