कोल्हापूर : यंदाच्या ऊसदराचा तिढा लवकर सुटला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे यंदाचा दर निश्चित झाला. तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना एकूण ४२०० रुपये प्रति टन दर निश्चित झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र कारखान्यांच्या वजन काट्यांवर गडबड होण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत स्वाभिमानी संघटनेने शेतकऱ्यांना खासगी काट्यांवर ऊस वजन करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे वजनातील संभाव्य तफावत लक्षात येऊन फसवणूक टाळता येईल, असे संघटनेने म्हटले आहे. जादा ऊस दराच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांकडून वजनात काटछाट होण्याची शक्यता असल्यामुळे कारखान्यांवर ऊस पाठविण्यापूर्वी खासगी वजन काट्यावर वजन करून घेण्याचे आवाहन केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी दरासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांनी आता वजनाबाबतही सतर्क राहण्याची गरज आहे. याबाबत जनजागृतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तालुक्यात प्रमुख ठिकाणी फलक लावले आहेत. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील म्हणाले, की शेतकरी हिताचा विचार करून वजन काटाधारकांनी सहकार्य करावे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या अंतिम ऊस दरासाठी विविध शेतकरी संघटनांनी प्रयत्न केले. खासगी वजनकाटाधारक तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांनी अल्पदरामध्ये उसाचे वजन करून द्यावे, यासाठी तहसीलदारांना निवेदन देणार आहोत.


















