पुणे : राज्यातील प्रचलित पद्धतीनुसार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस तोडून तो कारखान्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कारखान्यांकडून घेतली जाते. मात्र, या प्रक्रियेसाठी येणारा खर्च शेतकऱ्यांना देय असलेल्या रास्त व किफायतशीर दराच्या (एफआरपी) रकमेतून वजा केला जातो. त्यामुळे ऊसतोडणी व वाहतूक खर्च जितका अधिक, तितकी शेतकऱ्यांच्या हातात पडणारी प्रत्यक्ष रक्कम कमी होते. त्यामुळे साखर आयुक्तालयाने २०२५-२६ च्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना स्वतः ऊसतोडणी करून तो संबंधित कारखान्याला देण्याचाही पर्याय उपलब्ध होणार आहे. यातून ऊस बिलातून होणारी कपात कमी करण्याचा प्रयत्न आहे.
साखर आयुक्तालयाने राज्यातील साखर कारखान्यांचा प्रत्यक्ष ऊसतोडणी व वाहतूक खर्च जाहीर केला आहे. मात्र कारखान्यांकडून आकारला जाणारा खर्च जास्त असल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून सातत्याने केली जाते. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी २०२५-२६ च्या हंगामातील कारखानानिहाय प्रत्यक्ष खर्चाची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना परिसरातील कारखान्यांचा खर्चासह जवळच्या अन्य कारखान्यांच्या खर्चाशी तुलना करणे शक्य होणार आहे. तसेच या खर्चाची जवळच्या कारखान्यांशी तुलना करून शेतकऱ्यांना कारखाना निवडता येणार असून, खर्च जास्त वाटल्यास स्वतः ऊस तोडून कारखान्यांना पाठविण्याची मुभाही देण्यात आली आहे.


















