अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा संघर्ष पेटणार! ४ हजार रुपये प्रतिटन दरासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली २३ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अहिल्यानगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला, तरी बहुतांश कारखान्यांनी अद्याप ऊसदर जाहीर केलेला नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. संघटनेचे पदाधिकारी रवींद्र मोरे यांनी ही माहिती दिली.

महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होणार असून, त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

साखर कारखानदारांच्या भूमिकेवर संघटनेचा संताप

ऊसदर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी कारखानदारांना निवेदने देणे, रास्ता रोको, गाळप बंद पाडणे, महामार्ग अडविणे तसेच पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठका घेणे असे विविध मार्ग अवलंबले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन बैठका होऊनही कारखानदारांनी दराबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.काही कारखान्यांनी जाहीर केलेले दर मागील वर्षाच्या तुलनेतही कमी असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

गतवर्षी साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,४०० रुपये असतानाही शेतकऱ्यांना उसासाठी ३,१३० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. यंदा साखरेचे दर प्रतिक्विंटल ५,३०० ते ५,४०० रुपयांपेक्षा अधिक असतानाही काही कारखान्यांनी केवळ ३,१०० ते ३,२०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. हा शेतकऱ्यांवरील अन्याय असून, त्यांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा आरोप रवींद्र मोरे यांनी केला.कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तुलनेने अधिक दर मिळत असताना अहिल्यानगर जिल्ह्यात कमी दर का, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे.

‘कोल्हापूर पॅटर्न’नुसार ४ हजार रुपये दराची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर पॅटर्ननुसार उसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यामध्ये गाळप सुरू झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत पहिली उचल म्हणून ३,७०० रुपये द्यावेत. कारखान्याचा गळीत हंगाम संपताना आणखी १०० रुपये आणि साखरेचे दर प्रतिकिलो ४५ रुपयांवर स्थिर राहिल्यास पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी अतिरिक्त २०० रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेश ताके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील केवळ सात कारखान्यांनी जाहीर केली पहिली उचल

अहिल्यानगर जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे. आतापर्यंत सुमारे ३० लाख २० हजार ६१८ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यापासून २५ लाख ३७ हजार ७२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. मात्र, अद्याप ऊसदराचा तिढा कायम आहे.जिल्ह्यातील १८ पैकी केवळ सात कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. सहकारी साखर कारखान्यांमध्ये काळे आणि थोरात कारखान्यांनी प्रतिटन ३,२०० रुपये, तर घुले, अशोक, ढाकणे, मुळा आणि अगस्ती या पाच कारखान्यांनी प्रतिटन ३,१०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. उर्वरित ११ कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केलेला नाही.मात्र, जाहीर केलेली पहिली उचल शेतकऱ्यांना मान्य नसून, किमान ४,२०० रुपये दर मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

जिल्हा बँकेच्या कर्जवाटपावर ऊसदराचे गणित अवलंबून?

ऊसदर निश्चित करण्यामध्ये जिल्हा सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना मिळणाऱ्या कर्जाची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. जिल्हा बँकेवर प्रशासक असल्याने कारखान्यांना किती कर्ज उपलब्ध होणार, याचा निर्णय प्रलंबित होता.बँकेकडून साखरेच्या पोत्यांच्या किमतीनुसार कारखान्यांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र, चालू हंगाम सुरू होऊनही कारखान्यांना कर्ज उपलब्ध झाले नव्हते. आता बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाची निवड झाली असल्याने आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जवाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे कारखानदारांसह शेतकरी संघटनांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात साखर उतारा अवघा ८.४ टक्के

जिल्ह्यातील साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचे चित्र गाळपाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत ३० लाख २० हजार ६१८ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून २५ लाख ३७ हजार ७२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा साधारणतः १० टक्के असतो. मात्र, यंदा तो केवळ ८.४ टक्के नोंदविण्यात आला आहे. ढाकणे कारखान्याचा साखर उतारा सर्वांत कमी ५.५७ टक्के, तर बारामती अॅग्रोचा सर्वाधिक ९.५१ टक्के आहे. त्यामुळे कमी साखर उताऱ्याचाही कारखान्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

थोरात कारखान्याची ३,२०० रुपयांची उचल शेतकऱ्यांना अमान्य

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने जाहीर केलेली प्रतिटन ३,२०० रुपयांची पहिली उचल शेतकरी नेत्यांनी अमान्य केली आहे. ऊसदरात वाढ करण्यासाठी कारखाना प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत समाधानकारक निर्णय न झाल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर शेतकरी नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शेतकरी नेते आणि साखर अभ्यासक वसंतराव गुंजाळ यांनी कारखान्याच्या वार्षिक अहवालातील आर्थिक आकडेवारीचा संदर्भ देत व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अहवालातील काही आकडेवारी आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी होणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी संभाव्य आर्थिक अनियमिततेबाबत संशय व्यक्त केला.

कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या कार्यकाळात केवळ साखर उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे उसाला १,१०० रुपये दर दिला जात होता. असे असताना सध्याच्या काळात केवळ ३,२०० रुपये पहिली उचल जाहीर करणे म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका गुंजाळ यांनी केली.

शेतकरी नेते संतोष रोहम यांनीही ऊसदराच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी १९ नोव्हेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कारखाना प्रशासनाला चर्चेसाठी वेळ मिळावा आणि दरवाढीबाबत तोडगा निघण्याची शक्यता लक्षात घेऊन आंदोलन तूर्तास पुढे ढकलण्यात आले आहे. प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतरही निर्णय न झाल्यास संगमनेर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा रोहम यांनी दिला.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, शेतकरी नेते दीपक वाळे, रमेश शिंगोटे, रोहिदास खताळ आणि रोहिदास साबळे उपस्थित होते.

रयत क्रांती संघटनेतर्फे साखर सम्राटांच्या पुतळ्याचे दहन

दरम्यान, खुडसरगाव येथील शेतकऱ्यांनी ऊसदराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील साखर कारखानदारांचा निषेध केला. शेतकऱ्यांनी साखर सम्राटांच्या पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला.रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार यांनी सांगितले की, यापूर्वी शेतकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनानंतर १२ तारखेला बैठक घेऊन ऊसदराचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. बैठकीला मोजकेच कारखानदार उपस्थित राहिले आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत केवळ बैठकीचा फार्स करण्यात आला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम साखर कारखानदारांकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा जिल्ह्यातील दोन्ही महामार्ग बंद करण्याचा इशाराही पवार यांनी दिला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांना प्रतिटन ४,२०० रुपये दर देऊ शकतात, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखानदारांना तो का शक्य होत नाही, असा सवाल उपस्थित केला.

ऊसदराच्या लढ्याला व्यापक स्वरूप

जिल्ह्यातील १८ कारखान्यांपैकी केवळ सात कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली असून, जाहीर झालेल्या दरावरही शेतकरी समाधानी नाहीत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ४ हजार रुपयांचा दर, इतर संघटनांची ४,२०० रुपयांची मागणी, थोरात कारखान्याला दिलेली १५ दिवसांची मुदत आणि २३ नोव्हेंबरचा जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा या घडामोडींमुळे अहिल्यानगरमधील ऊसदराचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता कारखानदार आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here