पुणे : पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ऊस गाळप आणि साखर उत्पादनात खासगी कारखान्यांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे, साखरेच्या निव्वळ उताऱ्यातही सहकारी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८८ टक्के असून, खासगी कारखान्यांचा उतारा ८.७१ टक्के इतका आहे. जिल्ह्यातील एकूण १३ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३५ लाख ५२ हजार १७० टन उसाचे गाळप करून ३३ लाख १५ हजार ९१९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
जिल्ह्यातील एकूण ऊस गाळपात सहकारी कारखान्यांचा वाटा अधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आठ सहकारी साखर कारखान्यांनी मिळून १८ लाख ९८ हजार ५४५ टन उसाचे गाळप केले असून, त्यातून १८ लाख ७५ हजार ९५५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या कारखान्यांचा सरासरी निव्वळ साखर उतारा ९.८८ टक्के नोंदविण्यात आला आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील पाच खासगी साखर कारखान्यांनी १६ लाख ५३ हजार ६२५ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १४ लाख ३९ हजार ९६४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, या कारखान्यांचा सरासरी निव्वळ साखर उतारा ८.७१ टक्के आहे. त्यामुळे गाळपाबरोबरच साखर उत्पादन आणि उताऱ्याच्या बाबतीतही सहकारी कारखान्यांनी सरस कामगिरी केली आहे.
बारामती अॅग्रो गाळपात प्रथम
जिल्ह्यातील कारखान्यांच्या कामगिरीचा विचार करता बारामती अॅग्रोने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कारखान्याने सहा लाख २३ हजार ९५१ टन उसाचे गाळप करून पाच लाख २७ हजार ८३२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.दौंड शुगरने पाच लाख २५ हजार २८० टन उसाचे गाळप करून दुसरे स्थान मिळविले आहे. मात्र, या कारखान्याचा निव्वळ साखर उतारा ८.२५ टक्के असून, जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये तो सर्वांत कमी आहे.
चार कारखान्यांचा उतारा १० टक्क्यांहून अधिक
साखर उताऱ्याच्या बाबतीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारखान्याने तीन लाख ३१ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले असून, त्याचा निव्वळ साखर उतारा ११.०६ टक्के आहे.माळेगाव साखर कारखान्याचा उतारा १०.१५ टक्के, भीमाशंकर कारखान्याचा १०.१० टक्के, तर श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचा १०.६३ टक्के नोंदविण्यात आला आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील चार कारखान्यांनी १० टक्क्यांपेक्षा अधिक निव्वळ साखर उतारा मिळविला आहे.


















