सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ (जैनापूर) येथे महावितरणच्या विद्युत रोहित्रामध्ये (डीपी) शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत ११ शेतकऱ्यांचा सुमारे ३० एकर ऊस जळून खाक झाला. सोमवारी (ता. १६) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, याच डीपीमध्ये यापूर्वी तीन वेळा शॉर्टसर्किट होऊन नुकसान झाले होते. चौथ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
मौजे जैनापूर येथील रतनलाल विश्वनाथ जाधव यांच्या शेताच्या बांधावर महावितरणचा डीपी आहे. सोमवारी दुपारी या डीपीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यातून उडालेल्या ठिणग्यांमुळे शेजारील ऊस पिकाला आग लागली. वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच भीषण स्वरूप धारण केले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीत ऊस पिकासह ठिबक सिंचनाच्या पाईप आणि विद्युत ताराही जळून खाक झाल्या.
एकाच डीपीमधून चौथ्यांदा दुर्घटना
संबंधित डीपीमध्ये यापूर्वी २०१४, २०२० आणि २०२२ मध्येही शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या होत्या. वारंवार दुर्घटना घडूनही कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने चौथ्यांदा मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.आधीच दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणींमुळे शेतकरी संकटात आहेत. अशा परिस्थितीत कष्टाने वाढविलेला आणि काढणीला आलेला ऊस आगीत जळून गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ऊस हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तातडीने पंचनामे करून भरपाई द्या
आगीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि त्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी. तसेच वारंवार शॉर्टसर्किट होणाऱ्या धोकादायक डीपीची कायमस्वरूपी दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पुजारी आणि ग्रामस्थांनी केली आहे.


















