सांगली : शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ३९०० रूपये प्रति टन देण्यात येणार आहे. तसेच प्रति टन अर्धा किलो साखर देण्यात येणार आहे. यंदा ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणा कार्यरत आहे. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी ही माहिती दिली. नोंदीनुसार ऊसाची तोड होऊन वेळेत गाळपासाठी ऊस कारखान्यात येईल, याची दक्षता शेती विभागामार्फत घेतली जात आहे. शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘विश्वास’ कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्ष नाईक म्हणाले की, सन २०२५-२६ च्या हंगामात ४ लाख ३० हजार २३५ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते. त्यासाठी आधारभूत किमतीपेक्षा जास्त दर दिला आहे. गेल्यावर्षी ३५०० रुपये दर देण्यात आला. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना दहा टक्के बोनसही दिला. त्यामुळे शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या आनंदात भर टाकण्याचे काम केले आहे. कारखान्याचा मुख्य कणा ऊस उत्पादक शेतकरी आहे. त्यामुळे त्यांचे हित महत्वाचे आहे. त्यामुळे तकऱ्यांना २०२६-२७ च्या हंगामात उचल व प्रतिटन अर्धा किलो साखर देण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते.


















