सोलापुरात ऊसदराचा संघर्ष पेटला! ३,१५० रुपयांपुढे दर देण्यास कारखानदारांचा नकार; कार्तिकीनंतर महामार्ग आणि रेल्वे रोखण्याचा शेतकरी संघटनांचा इशारा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई आणि घटलेले ऊस उत्पादन यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना साखर कारखानदारांकडून अपेक्षित दर दिला जात नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. प्रतिटन ३,१५० रुपयांपेक्षा अधिक दर देण्यास कारखानदारांनी स्पष्ट नकार दिल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री झालेली बैठक निष्फळ ठरली.

शेतकरी संघटना वाढीव दराच्या मागणीवर ठाम असून कारखानदार मात्र ३,१५० रुपयांच्या दरावर अडून बसले आहेत. त्यामुळे बैठकीत कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. अखेर कारखानदारांनी आणखी दोन दिवसांची मुदत मागितली. प्रशासनाच्या विनंतीनुसार शेतकरी संघटनांनीही दोन दिवसांची मुदत देण्यास सहमती दर्शवली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुकारलेले चक्काजाम आंदोलन २२ तारखेपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. मात्र, या मुदतीत सन्मानजनक तोडगा न निघाल्यास सोलापूरकडे येणारे चारही महामार्ग आणि रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

राजू शेट्टींच्या मोर्चानंतर बैठकीला वेग

सोमवारी (ता. १६) माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊसदराच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून आवारातच ठिय्या आंदोलन केले होते. मध्यरात्री एक वाजेपर्यंत चर्चा होऊनही तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन यांनी गुरुवारी (ता. १९) अंतिम बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते.मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांना गुरुवारी प्रशासकीय कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागणार असल्याने विभागीय साखर सहसंचालक आणि जिल्हा प्रशासनाने नियोजित बैठक एक दिवस आधीच बुधवारी रात्री घेण्याचे ठरवले. ही बैठक राजू शेट्टी उपस्थित राहू नयेत म्हणून एक दिवस आधी घेण्यात आल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

बैठकीला कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित

या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, राजन पाटील, धर्मराज काडादी, महेश देशमुख, सतीश देशमुख, विरप्पा जाधव, अपर पाटील, कल्याण काळे, राजलक्ष्मी गायकवाड, शिवानंद पाटील, गणपतराव साठे, संजय आवताडे, पुश्वर्याराव सावंत आणि अनिल सावंत यांच्यासह विविध साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेतकरी संघटनांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, जनहितचे प्रभाकर देशमुख, तानाजी बागल, दीपक भोसले, समाधान फाटे, सचिन पाटील, अजित बोरकर, युवराज घुले, राहुल मुले आणि शहाजहान शेख यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली.जिल्हाधिकारी एस. कार्तिकयन, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी गणेश निन्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, साखर सहसंचालक किरण गायकवाड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन उपस्थित होते.

पालकमंत्र्यांचा ३,२५० अधिक १०० रुपयांचा प्रस्ताव

शेतकरी आणि कारखानदार या दोन्ही घटकांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे. कारखाने बंद राहिल्यास ऊस शेतातच राहून त्याच्या वजनात घट होईल आणि अंतिमतः शेतकऱ्यांचेच नुकसान होईल. कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याची भूमिका घेत दोन दिवसांची मुदत मागितली आहे.राजू शेट्टी यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. प्रशासनाने सुचवलेल्या प्रतिटन ३,२५० रुपये अधिक १०० रुपये या प्रस्तावावर दोन दिवसांत निर्णय कळवावा, अशा लेखी सूचना जिल्हाधिकारी कारखानदारांना देणार आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. मात्र, कारखाने बंद पाडून हा प्रश्न सुटणार नाही. शेतकरी संघटनांनीही दोन दिवसांची मुदत देण्यास संमती दर्शवली आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

रात्री उशिरा सुरू झाली बैठक

बुधवारी रात्री आठ वाजता बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत डीसीसी बँकेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ रात्री ८.४८ वाजता संपला. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृहात पोहोचले. तेथे काही प्रमुख कारखानदारांसोबत ऊसदराच्या प्रश्नावर प्राथमिक चर्चा झाली.यानंतर रात्री ९.५२ वाजता पालकमंत्री जिल्हा नियोजन भवनात पोहोचले आणि मुख्य बैठकीला सुरुवात झाली. रात्री ११.३० वाजेपर्यंत चर्चा सुरू होती. त्यानंतर पुन्हा कारखानदारांसोबत चर्चा करून पालकमंत्री मध्यरात्री १२ वाजता बाहेर पडले.

२२ तारखेपर्यंत तोडगा न निघाल्यास महामार्ग आणि रेल्वे रोखणार

प्रशासनाला मान देऊन आणि पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेचा विचार करून आम्ही २२ तारखेपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे. पालकमंत्र्यांनी प्रतिटन ३,२५० रुपये अधिक १०० रुपयांचा प्रस्ताव दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश काढण्याची तयारीही दर्शवली. तरीही कारखानदार बैठकीतून उठून गेले.

२२ तारखेपर्यंत सन्मानजनक तोडगा न निघाल्यास सोलापूरकडे येणारे चारही महामार्ग आणि रेल्वे वाहतूक रोखली जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला.

कारखानदारांमध्येही दरावरून मतभेद

बैठकीत कारखानदारांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या कमतरतेचा मुद्दा उपस्थित केला. उसाचे उत्पादन कमी असल्याने साखरेचा उतारा अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याचे सांगत त्यांनी प्रतिटन ३,१५० रुपयांपेक्षा अधिक दर देण्यास नकार दिला.मात्र, शेजारच्या कर्नाटकात प्रतिटन ३,७०० रुपये आणि कोल्हापूर जिल्ह्यात ४,२०० रुपयांपर्यंत दर मिळत असताना सोलापूरमधील कारखानदारांना वाढीव दर देण्यात अडचण काय, असा सवाल शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केला. साखरेबरोबरच इतर उपपदार्थांपासूनही कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांना वाढीव दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

बैठकीत नेमके काय घडले?

  • कारखानदारांनी प्रतिटन ३,१५० रुपयांपेक्षा अधिक दर देण्यास असमर्थता दर्शवली.
  • शेतकरी संघटनांनी ३,३०० रुपये पहिली उचल आणि त्यानंतर दोन टप्प्यांत प्रत्येकी १०० रुपये देण्याची मागणी केली.
  • साखरेचे दर कायम राहिल्यास आणखी १०० रुपयांचा तिसरा हप्ता देण्याची मागणी करण्यात आली.
  • कारखानदारांनी वाढीव दराच्या मागणीला विरोध केला.
  • पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिटन ३,२५० रुपये अधिक १०० रुपये असा मध्यममार्ग सुचवला.
  • प्रशासनाकडून गुरुवारी लेखी आदेश काढण्याबाबत चर्चा झाली.
  • मात्र, कारखानदारांनी अंतिम निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत मागितली.

दुष्काळाचा गैरफायदा घेत शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न : स्वाभिमानी

बैठकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी कारखानदारांवर गंभीर आरोप केले. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा कारखानदार गैरफायदा घेत असून जाणीवपूर्वक आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही कोणताही कारखाना बंद ठेवण्याची मागणी केलेली नसताना कारखानदार स्वतःहून कारखाने बंद ठेवण्याची आणि ऊस वाळवण्याची धमकी देत आहेत. ऊस वाळल्यानंतर शेतकरी संतप्त होतील आणि त्यांच्यातच फूट पडेल, असा डाव आखला जात असल्याचा आरोप रणदिवे यांनी केला. भीमा नदीच्या पलीकडील कर्नाटकातील कारखाने ३,६०० रुपये देत असताना सोलापूरमधील कारखानदार ३,००० रुपयांच्या आसपासचा दर सांगत आहेत. हा विरोधाभास शेतकऱ्यांना समजतो. या दोन दिवसांत कोणी कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर तो बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

पोलिस आयुक्तांची शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

ऊसदराच्या प्रश्नावर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत होणाऱ्या बैठकीपूर्वी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी त्यांनी ऊसदराच्या प्रश्नावर चर्चेतून तोडगा निघू शकतो, मात्र आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन केले. रेल्वे आणि रस्ते अडवल्यामुळे रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे कायदेशीर मार्गाने आंदोलन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.या बैठकीला पोलिस उपायुक्त प्रीतम बावलकर यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कारखानदारांच्या संगनमताचा शेतकरी संघटनेचा आरोप

कर्नाटकात प्रतिटन ३,६०० ते ३,७०० रुपये, सांगलीत ३,७०० रुपये, तर कोल्हापूर जिल्ह्यात ४,२०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थिती असलेल्या मराठवाड्यातील कारखानेही ३,३५० रुपयांपेक्षा अधिक दर देण्यास तयार असताना सोलापूरमधील कारखानदारांनी संगनमताने ३,१५० रुपयांचा दर निश्चित केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत कारखानदारांची दुपारी स्वतंत्र बैठक झाल्याचाही दावा संघटनेने केला.

राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त कडक

ऊसदराच्या बैठकीपूर्वीच माजी खासदार राजू शेट्टी यांनी समाजमाध्यमांद्वारे इशारा दिला होता. बैठकीत ऊसदरावर तोडगा न निघाल्यास गुरुवारी सकाळपासून रेल्वे आणि महामार्ग रोखण्यात येतील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता.या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात बंदोबस्त वाढवला होता. आता २२ तारखेपर्यंत ऊसदराचा प्रश्न मार्गी लागतो की शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here