कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी शॉर्टसर्किटमुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी उसाच्या शेतांना आग लागून तब्बल २४ एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्यांमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
वंदूरमध्ये २० एकरांहून अधिक ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी
कागल तालुक्यातील वंदूर येथे बुधवारी लागलेल्या भीषण आगीत २० एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. या आगीत केवळ ऊसच नव्हे, तर शेतीसाठी बसविण्यात आलेले ठिबक सिंचन संच आणि इतर साहित्यही जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच कागल नगरपालिकेचे तसेच शाहू साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केले. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनीही एका बाजूने ऊसतोड करून आग पुढे पसरण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
करवीर तालुक्यात चार एकरांतील ऊस जळाला; सात शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान
करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील गुरवकी परिसरात बुधवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागली. या आगीत सुमारे साडेतीन ते चार एकरांवरील ऊस जळून खाक झाला. या घटनेत सात शेतकऱ्यांचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उसाच्या शेतातून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट बाहेर पडत असल्याचे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून नुकसान झाले होते.या आगीत बबन पाटील (२० गुंठे), कृष्णा पाटील (१६ गुंठे), धोंडिराम आमटे (१० गुंठे), अर्जुन आमटे (१० गुंठे), बाजीराव पाटील (३४ गुंठे), बाजीराव पाटील (१६ गुंठे) आणि हरी पाटील (१५ गुंठे) यांच्या उसाचे नुकसान झाले. या घटनेतही शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरणने द्यावी, अशी मागणी केली आहे.
नुकसानभरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
एकाच दिवशी जिल्ह्यातील दोन ठिकाणी लागलेल्या आगीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता जळालेल्या उसाच्या नुकसानीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.


















