कोल्हापूर : गडहिंग्लज विभागात ऊस गाळपाला गती, आतापर्यंत १.३१ लाख टन गाळप पूर्ण

कोल्हापूर : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत ऊस दराच्या प्रश्नात यशस्वी तोडग्यानंतर साखर कारखान्यांची चाके हळूहळू गती घेत आहेत. या विभागात आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना, आजरा तालुका शेतकरी कारखाना, चंदगडमधील दौलत अथर्व, इको-केन आणि ओलम शुगर (हेमरस) हे पाचही कारखाने सुरू झाले आहेत. कारखान्यांनी गाळपात गती घेतली असून १७ नोव्हेंबरअखेर एक लाख ३१ हजार टन उसाचे गाळप झाले आहे. दरम्यान, दौलत-अथर्व कारखाना काही तांत्रिक कारणामुळे गेल्या काही दिवसापासूनच सुरू झाला आहे.

उपलब्ध आकडेवारीवरून हंगाम सुरू झाल्यापासून आजअखेर साखर उताऱ्यात हेमरस आणि गोडसाखर कारखाने भारी ठरले आहेत. इको केन व आजरा कारखान्याचा उतारा समान आहे. सुरुवातीला अडखळत सुरू झालेला हंगाम पंधरावड्यानंतर सुरात आला आहे. प्रत्येक कारखान्यांत आपल्या क्षमतेनुसार गाळप सुरू आहे. हळूहळू गाळप वाढण्यासह साखर उताऱ्यातही सुधारणा होऊ लागली आहे. दौलत-अथर्व कारखान्याची साखर बॉयलिंग हाउसमध्येच आहे. अजून साखरच न पडल्याने त्याचा उतारा अद्याप जाहीर झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने ऊस उत्पादन ३५ ते ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती करताना कारखान्यांची दमछाक होणार आहे. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याने आपली गाळप क्षमता वाढविली. आता रोज तीन हजार टनांवर गाळप सुरू आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here