महाराष्ट्रात मागील हंगामातील अंतिम साखर उतारा जाहीर; एफआरपीसाठी चालू हंगामाचा उतारा ग्राह्य धरणार नाही

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी २०२५-२६ या मागील गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाचा अंतिम साखर उतारा गुरुवारी (दि. १९) जाहीर करण्यात आला. यंदाच्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीची (रास्त व किफायतशीर दर) गणना करताना चालू हंगामाऐवजी मागील हंगामातील अंतिम साखर उतारा विचारात घेतला जाणार आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा चालू हंगामातील उतारा गृहीत धरण्याचा निर्णय रद्द केल्याने या आकडेवारीकडे शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले होते. याबाबतचे वृत्त दैनिक ‘अॅग्रोवन’ने दिले आहे.

एफआरपी निश्चित करण्याच्या पद्धतीत राज्य सरकारने गाळप हंगाम २०२१-२२ पासून बदल केला होता. मागील हंगामातील साखर उताऱ्याऐवजी संबंधित गाळप हंगामातील साखर उतारा विचारात घेऊन एफआरपी द्यावी, असा निर्णय २१ फेब्रुवारी २०२२ रोजी घेण्यात आला होता. या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने हा शासन निर्णय रद्द केला आहे. दरम्यान, या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली असून, त्यावरील निर्णयाकडे संपूर्ण साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीचा शासन निर्णय रद्द केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. तसेच, एफआरपी अदा करण्यासाठी पूर्वीचीच कार्यपद्धती कायम ठेवण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाला दिल्या आहेत. त्यानुसार, मागील गाळप हंगामातील साखर उतारा आणि तोडणी-वाहतूक खर्च विचारात घेऊन एफआरपीचा पाक्षिक अहवाल सादर करण्याचे आदेश साखर आयुक्तालयाने राज्यातील सर्व प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले आहेत.

दरम्यान, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी राज्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण २१० साखर कारखान्यांचा २०२५-२६ हंगामातील अंतिम साखर उतारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात बी-हेवी मळी आणि उसाच्या रसाचा वापर केल्यामुळे साखर उताऱ्यात झालेली घट तसेच कारखानानिहाय अंतिम साखर उताऱ्याची सविस्तर आकडेवारी देण्यात आली आहे.

सध्या राज्यात २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू आहे. या हंगामातील एफआरपी निश्चित करण्यासाठी मागील वर्षातील कारखानानिहाय अंतिम साखर उताऱ्याची आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपल्या सभासदत्वाच्या कारखान्याचा साखर उतारा किती होता, तसेच परिसरातील इतर कारखान्यांच्या तुलनेत तो किती आहे, याची माहिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

साखर आयुक्तालयाने जाहीर केलेली अंतिम साखर उताऱ्याची आकडेवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील उताऱ्याचा अंदाज घेण्यासाठी आणि साखर कारखान्यांना एफआरपीची अचूक परिगणना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here