कर्नाटक : बेळगावमध्ये सुरक्षित ऊस वाहतुकीवर भर, पोलिस प्रशासनाकडून वाहनांना रिफ्लेक्टर बंधनकारक

बेळगाव : नोव्हेंबर ते जानेवारी या हिवाळ्याच्या काळात धुक्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी होते. अशा परिस्थितीत रस्त्यावरून जाणारी तसेच कडेला उभी असलेली वाहने इतर वाहनचालकांना वेळेत दिसत नाहीत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना योग्य इंडिकेटर असणे, चालकांकडे वैध परवाना असणे यांसह वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी गुरुवारी दिला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. अपघात रोखण्यासाठी पोलिस पथकांकडून चोवीस तास गस्त राहणार असल्याचे रामराजन यांनी सांगितले.

जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी पत्रकारांशी बोलताना ऊस वाहतूक आणि रस्ते सुरक्षेबाबत पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने रस्त्यांवर ट्रॅक्टर व ट्रकची वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला दर्जेदार रिफ्लेक्टर आणि रिफ्लेक्टर पट्ट्या बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ट्रॅक्टर आणि ट्रकना पुढील तसेच मागील बाजूस योग्य दर्जाचे रिफ्लेक्टर लावावेत, वाहनांचे इंडिकेटर व्यवस्थित सुरू आहेत की नाही, याची नियमित तपासणी करावी, रस्त्यावर वाहने उभी करताना इतर वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना मोठ्या आवाजातील डीजे आणि साउंड सिस्टीम बसवून गावांमधून फिरण्याच्या प्रकारांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. वाहनचालकांकडे वैध वाहन परवाना असणे आवश्यक आहे. वाहनमालक आणि साखर कारखान्यांनीही सर्व वाहनांची सुरक्षितता तपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here