बीड : दुष्काळ नजरेसमोर ठेवून शेतकऱ्यांकडून नियोजन, उसाच्या वाढ्याचा तयार होतोय मुरघास!

बीड : यंदा बीड जिल्ह्यात सर्वत्र तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने नदी, नाले, विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. पाण्याअभावी रब्बी हंगामाची आशा धूसर बनली असतानाच, शेतकऱ्यांसमोर कुटुंबाचा आर्थिक कणा असलेल्या पशुधनाला जगवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्याला शेतकरी पर्याय शोधत आहेत. बीड तालुक्यातील काळेगाव (हवेली) येथील पशुपालक शेतकरी विकास राऊत यांनी उसाच्या वाढ्याची कुट्टी करून मुरघास निर्मिती केली आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीपुढे हार न मानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक आणि कल्पक मार्गाचा अवलंब करून चारा निर्मितीचे व साठवणुकीचे प्रभावी पर्याय शोधून काढले आहेत.

दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीनंतर चारा टंचाई जाणवते. मात्र यंदा नोव्हेंबर महिन्यातच भिषण स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी हिरव्या चाऱ्याला प्राधान्य देत आहेत. हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी तालुक्यातील शेतकरी सध्या ऊस उत्पादकांच्या फडात जाऊन हिरवे वाढे विकत आणत आहेत. चाऱ्याची मागणी अचानक प्रचंड वाढल्याने उसाच्या वाढ्याला सध्या ६०० रुपये प्रति शेकडा असा चढा भाव मोजावा लागत आहे. याबाबत नाळवंडी येथील पशुपालक शेतकरी मोहन तंबरे म्हणाले की, जनावरांना वर्षभर चांगला आणि ओला चारा खायला मिळावा, यासाठी उसाच्या फडातून हिरवे वाढे विकत आणले आहेत. हे वाढे वाळून जाऊ नयेत, म्हणून मशिनच्या साहाय्याने त्यांची बारीक कुट्टी करून घेतली आहे. ही कुट्टी हवाबंद पिशव्यांत व्यवस्थित दाबून भरल्याने वाढ्यांतील ओलावा आणि कस कायम टिकून राहतो. हिरव्या चाऱ्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला असून, दूध उत्पादनातही चांगली मदत होत आहे. हा मुरघास हिरव्या चाऱ्याला उत्तम पर्याय ठरत असून, जनावरांना पुढील सात ते आठ महिने सहज पुरतो. वरे हा चारा अत्यंत आवडीने खातात.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here