बँकॉक : प्रस्तावित परस्पर व्यापार कराराअंतर्गत (ART) अमेरिकेतून होणाऱ्या इथेनॉल आयातीवर बिगर-शुल्क अडथळे कायम ठेवावेत, अशी मागणी थायलंडमधील ऊस उत्पादकांनी सरकारकडे केली आहे. अमेरिकेसाठी बाजारपेठ खुली केल्यास देशांतर्गत इथेनॉल उत्पादकांना फटका बसेल, कृषी कच्च्या मालाची मागणी घटेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. बँकॉक पोस्टने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
प्रस्तावित कराराच्या चौकटीअंतर्गत अमेरिकेच्या औद्योगिक उत्पादनांच्या निर्यातीतील अडथळे दूर करण्यासाठी थायलंडला उपाययोजना कराव्या लागण्याची शक्यता आहे. यामध्ये अमेरिकेतून इंधनासाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या आयातीसाठी परवाने देण्याचाही समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि थायलंडचे पंतप्रधान अनुटिन चार्नविराकुल यांनी १७ नोव्हेंबर रोजी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली. या निवेदनात शुल्क आणि बिगर-शुल्क अडथळ्यांबाबत चर्चेसाठीची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अंमलबजावणीसंबंधीचे तपशील अद्याप चर्चेच्या टप्प्यात आहेत.
थाई टॅपिओका फार्मर्स कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष रंगसी फैसाई-आर्ड यांनी सांगितले की, आयात केलेल्या इथेनॉलमुळे देशांतर्गत उत्पादनाची जागा घेतली जाऊ शकते. परिणामी, स्थानिक इथेनॉल प्रकल्पांकडून कसावा आणि इतर कृषी उत्पादनांची खरेदी कमी होण्याची शक्यता आहे. थायलंडमध्ये इथेनॉल उत्पादनाची पुरेशी क्षमता उपलब्ध आहे. तसेच सरकारकडून २० टक्के इथेनॉल मिश्रित E20 इंधनाला प्रोत्साहन दिले जात असल्याने स्थानिक पातळीवर उत्पादित जैवइंधनासाठी संधी निर्माण व्हायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
नॉर्थईस्टर्न थायलंड केन ग्रोअर्स इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष थिती-इब रत्तासुविरोज यांनीही देशांतर्गत इथेनॉल उत्पादन घटल्यास मळीची मागणी कमी होऊ शकते आणि त्याचा परिणाम संपूर्ण साखर पुरवठा साखळीवर होऊ शकतो, असा इशारा दिला. या दोन्ही शेतकरी संघटनांनी बाजारपेठ खुली करण्याच्या अटींना सहमती देण्यापूर्वी सरकारने शेतकरी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करावी, तसेच इथेनॉल वापरासाठी स्पष्ट उद्दिष्टे निश्चित करावीत, अशी मागणी केली आहे.
फेडरेशन ऑफ थाई इंडस्ट्रीजने ART कराराबाबतची चर्चा सुरू ठेवण्यास पाठिंबा दिला आहे. मात्र, या कराराचा देशांतर्गत उद्योगांवर होणारा परिणाम तपासण्याचे आवाहन सरकारला केले आहे. संघटनेच्या अध्यक्षा पिमजाई लीसरासाकुल यांनी सांगितले की, आयात धोरणाचा भर देशांतर्गत उत्पादन क्षमता मजबूत करणाऱ्या वस्तूंवर असावा. यामध्ये ऊर्जा उत्पादने, प्रगत यंत्रसामग्री, उच्च तंत्रज्ञानाची उपकरणे आणि देशांतर्गत पुरवठा पुरेसा नसलेला कच्चा माल यांचा समावेश असावा.


















