कोल्हापूर : राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे. सध्या हंगामाने गती पकडली आहे. १५ नोव्हेंबरअखेर राज्यातील १४५ साखर कारखान्यांपैकी केवळ ३२ कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची संपूर्ण रक्कम दिली आहे. उर्वरित ११३ कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी आहे. या कालावधीत राज्यातील १४५ कारखान्यांनी एकूण १०८.७१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपापोटी शेतकऱ्यांना ४ हजार ३१३ कोटी रुपयांची एफआरपी देय होती. त्यापैकी प्रत्यक्षात २ हजार ७८ कोटी रुपये अदा करण्यात आले असून, तब्बल २ हजार २३५ कोटी रुपयांची रक्कम अद्याप थकीत आहे.
एफआरपी अदा करण्याचे राज्यातील एकूण प्रमाण ४८.१८ टक्के असून, ५१.८२ टक्के रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. वाहतूक आणि तोडणी खर्च वगळून एफआरपीची देय रक्कम ३ हजार २२१ कोटी रुपये आहे. यापैकी कारखान्यांनी १ हजार ४५ कोटी रुपये अदा केले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष एफआरपी देण्याचे प्रमाण ३२.४४ टक्के आहे.
राज्यातील १५ साखर कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी अदा केली आहे, तर तीन कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के रक्कम दिली आहे. दुसरीकडे तब्बल ९५ कारखान्यांनी ६० टक्क्यांपेक्षाही कमी एफआरपी अदा केली आहे. राज्य शासनाने यंदा १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात करण्यास परवानगी दिली. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे हंगाम सुमारे पंधरा दिवस उशिराने सुरू झाला.
गेल्या काही दिवसांपासून बाजारात साखरेचे दर सातत्याने चांगले राहिले आहेत. केंद्र सरकारने साखर विक्रीचा कोटाही निश्चित केला आहे. त्यामुळे कारखान्यांना एफआरपीची रक्कम अदा करणे शक्य असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे तातडीने द्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. शिवाय, राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांचे मूल्यांकन वाढविले असल्याने कारखानदारांनी एफआरपी देण्यास टाळाटाळ करू नये. थकीत रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.


















