सोलापूर : साखर कारखाने चालविण्यासाठी मालमत्ता गहाण ठेवावी लागते. त्यामुळे प्रत्येक कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच ऊसदर निश्चित करावा लागेल. ‘घर जाळून कोळशाचा व्यापार करायचा का?’ असा सवाल उपस्थित करत लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचे प्रमुख आणि माजी आमदार राजन पाटील यांनी ३,२५० रुपये पहिली उचल आणि त्यानंतर १००-१०० रुपयांचे दोन हप्ते देण्याचा फॉर्म्युला अमान्य असल्याचे स्पष्ट केले.
ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याबद्दल शेतकरी संघटना आपल्याला जबाबदार धरत असल्याचे सांगून राजन पाटील म्हणाले की, शेतकरी संघटना सोलापूर आणि साखर कारखानदारांमध्ये दराबाबत नेमकी काय चर्चा झाली किंवा काय निर्णय घेण्यात आला, याची आपल्याला माहिती नाही. कारखान्यांचा साखर उतारा सात ते आठ टक्के असताना प्रतिटन ३,२५० रुपये पहिली उचल देणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मागील वर्षी भंडारकवठा येथील लोकमंगल साखर कारखान्याने अपेक्षित दर न दिल्याने शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस पुरवठा केला नव्हता. परिणामी कारखान्याच्या गाळपावर परिणाम झाला होता. यंदाही कमी दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस द्यायचा की नाही, याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकरीच घेतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिला.
रणदिवे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी पहिली उचल प्रतिटन ३,२५० रुपये, गाळप हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि साखरेचा दर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास आणखी १०० रुपये देण्याबाबत लेखी पत्र दिले आहे.
जिल्ह्यातील अन्य १५ ते १७ साखर कारखान्यांनाही हा ऊसदराचा फॉर्म्युला मान्य असून, त्यांच्याकडूनही लवकरच लेखी पत्रे मिळतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, १० ते १२ कारखानदार अद्यापही ऊसदराच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत आहेत. यामध्ये लोकमंगल, लोकनेते बाबुराव पाटील, जकराया, भैरवनाथ (एक ते तीन), वृंदावन आणि येडेश्वरी या साखर कारखान्यांचा समावेश असल्याचे विजय रणदिवे यांनी सांगितले.


















