कर्नाटक : मार्कंडेय कारखाना १५ दिवसांत सुरू होणार, यंदा अडीच लाख टन ऊस गाळप करणार

बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने कामांना गती देण्यात आली आहे. सध्या अंतर्गत यंत्रसामग्रीची दुरुस्ती व देखभालीची कामे सुरू असून, उर्वरित तांत्रिक कामे पूर्ण करून गाळप सुरू करण्याचे नियोजन संचालक मंडळाने केले आहे. कारखाना पुन्हा सुरू होणार असल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शुक्रवारी (ता. २०) अविनाश पोतदार यांच्या हस्ते कारखान्याचे बॉयलर पूजन करण्यात आले. तत्कालीन अध्यक्ष आर. आय. पाटील यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सध्या अध्यक्षांशिवायच कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हंगामापूर्वी अध्यक्षांची निवड होणार की रिक्त पदावरच कारभार सुरू राहणार, याबाबत सभासद आणि शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

दरम्यान, आगामी १५ दिवसांत कारखान्यात प्रत्यक्ष गाळप सुरू होण्याची शक्यता असून, यंदा दोन ते अडीच लाख टन ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. यापूर्वी २०१९ ते २०२३ या कालावधीत कारखान्यात गाळप हंगाम पार पडला होता. त्यानंतर नवीन संचालक मंडळानेही एकदा गाळप घेतले. मात्र, त्यानंतरची दोन वर्षे कारखाना बंद राहिला. आता ठेव स्वरूपातील रकमेतून आणि संचालक मंडळाच्या प्रयत्नांतून कारखाना सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. हंगामासाठी ऊसतोडणी टोळ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या अडचणी दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कोणतीही बिले थकीत नसल्याने कारखान्याला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसांत ऊसदर जाहीर होण्याची शक्यता आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here