पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास शेतीमध्ये उत्पादनवाढीसोबतच पाण्याचीही मोठी बचत होऊ शकते, हे बारामतीतील एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे. बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्राने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग येथील शेतात एकरी तब्बल १२० टन ऊस उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. बुधवारी (दि. २५) सकाळी शरद पवार यांनी स्वतः शेतात जाऊन या प्रयोगाची पाहणी केली.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि एआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी शरद पवार यांच्या पुढाकारातून राज्यात विविध प्रयोग राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या स्वतःच्या शेतातही एआय आधारित शेती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता पवार यांनी ऊसशेतीची पाहणी केली. यावेळी युवा नेते युगेंद्र पवार आणि विद्या प्रतिष्ठानच्या एआय सेंटरचे प्रमुख प्रा. निलेश नलवडे उपस्थित होते.
ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंत एआयचा वापर
शेताची पाहणी करताना प्रा. निलेश नलवडे यांनी पवार यांना एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस लागवडीपासून ते तोडणीपर्यंत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी पवार यांनी उसाची जात, पाणी देण्याचे नियोजन, खतांचा वापर, माती परीक्षण, खतांच्या मात्रा आणि पीक तोडणीसाठी तयार होण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती घेतली.
या प्रयोगातून एकरी १२० टन ऊस उत्पादन मिळाले असून, मागील १५ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत एकरी सुमारे ६० टनांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास ऊस उत्पादनात मोठी वाढ शक्य असल्याचे या प्रयोगातून दिसून आले आहे.
कमी पावसातही लाखो लिटर पाण्याची बचत
या प्रयोगाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमी पावसाच्या परिस्थितीतही एकरी लाखो लिटर पाण्याची बचत करण्यात आली आहे. ऊसशेतीसाठी लागणारे मोठ्या प्रमाणावरील पाणी, वाढता खतांचा खर्च आणि उत्पादनातील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर गोविंदबागेतील हा प्रयोग महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र यांच्या नेतृत्वाखाली कृषी विज्ञान केंद्र आणि एडीटी एआय ट्रेनिंग फाउंडेशनच्या पथकाने या प्रयोगासाठी विशेष मेहनत घेतली. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकाच्या गरजेनुसार पाणी आणि खतांचे नियोजन करण्यात आल्याने उत्पादनवाढीसोबत खर्च आणि संसाधनांची बचत साध्य झाली आहे.
आता एआय तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणार!
विद्या प्रतिष्ठानमधील सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड येथील तज्ज्ञांच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.
यावेळी युगेंद्र पवार यांनीही या तंत्रज्ञानाचा लाभ केवळ प्रायोगिक शेतीपुरता मर्यादित न राहता सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यासाठी संबंधित संस्था, तज्ज्ञ आणि शासनाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
एकरी १२० टन ऊस उत्पादन आणि लाखो लिटर पाण्याची बचत या दोन्ही बाबींमुळे बारामतीतील हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर ऊसशेतीसह इतर पिकांमध्येही वाढल्यास शेती अधिक उत्पादनक्षम आणि किफायतशीर होण्यास मदत होऊ शकते.


















