यवतमाळ : वसंत कारखान्याचा गाळप हंगामाबाबत खा. संजय देशमुख यांचा आक्षेप, जिल्हा बँकेच्या अवसायकांकडे तक्रार

यवतमाळ : वसंत सहकारी साखर कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने थकीत कर्जाची रक्कम ५६ कोटी ५५ लाख रुपयांवर पोहोचली. परिणामी कारखाना अवसायनात गेला. शासनाकडून कारखान्यावर अवसायक नियुक्त करण्यात आला. दुसरीकडे जिल्हा बँकेने सरफेसी कायदा २००२ अंतर्गत कारवाई करून कारखाना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या कारखान्याचा गाळप हंगाम बँकेला विश्वासात न घेता सुरू करण्यात आल्याचा आक्षेप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा खासदार संजय देशमुख यांनी घेतला आहे. या विषयाकडे अवसायकांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

बँकेच्या माहितीनुसार, भैरवनाथ शुगर्स कारखान्याकडून सुमारे १ कोटी ४९ लाख रुपयांची रक्कम येणे अपेक्षित असून, याशिवाय बँकेची अन्य देणीही प्रलंबित आहेत. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने बँकेने अवसायकांचे खाते गोठविण्याची कारवाई केली. तसेच साखर आयुक्तांकडे पत्र पाठवून कारखाना ताब्यात देण्यासह विक्रीची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. कारखान्याच्या कामगार संघटनेने पीएफ थकीत असल्याने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे सरफेसीअंतर्गत सुरू असलेल्या कारवाईला स्थगिती मिळाली. त्यानंतर साखर आयुक्तांनी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. थकीत कर्ज वसुलीसाठी भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड, पुणे यांच्यासोबत त्रिपक्षीय करार करण्यात आला. मात्र, भैरवनाथ शुगर लिमिटेडकडून भाडेतत्त्वावर चालविण्यात येणारा वसंत कारखाना बँकेशी चर्चा अथवा परवानगी न घेता सुरू केल्याचा आरोप आहे. याप्रश्नी कारवाई करण्याची मागणी खासदार देशमुख यांनी केली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here