लातूर : ऊस दरवाढ संघर्ष समितीने जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस वजनात होणाऱ्या काटामारीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी खासगी वजनकाट्यावर ऊसाचे वजन करून आणल्यास अनेक कारखाने ते वजन ग्राह्य धरत नाहीत. खासगी आणि कारखान्यांच्या वजनकाट्यांत तफावत आढळत असतानाही कारखान्यांच्या कारवाईच्या भीतीने शेतकरी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे गळीत हंगामातील चार महिन्यांत भरारी पथकांमार्फत प्रत्येक कारखान्याच्या वजनकाट्यांची दरमहा तपासणी करावी, या प्रक्रियेत शेतकरी व समितीच्या कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावे आणि खासगी काट्यावरील वजन ग्राह्य धरण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत समितीच्या कार्यकर्त्यांसह विविध संघटनांच्या जिल्हाध्यक्षांनी वैधमापनशास्त्र विभागाचे लातूर व धाराशिव जिल्ह्याचे उपनियंत्रक अ. ध. गेटमे यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांपैकी आतापर्यंत केवळ दोन कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी झाली आहे. उर्वरित ११ कारखान्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष का, असा सवाल समितीने केला. विभागाने तातडीने कारवाई न केल्यास समिती, विविध संघटना आणि शेतकरी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला. निवेदनावर संतोष नागरगोजे, राजाभाऊ चौगुले, नंदकिशोर साळुंखे, अरुणदादा कुलकर्णी, अजित जनार्धन घंटेवाड, कुलदीप सूर्यवंशी आणि सत्तार पटेल यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


















