सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने २०२६-२७ च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. कारखान्याने गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार ६०० रुपये दराने पहिली उचल शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केली आहे. कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. हंगाम सुरू झाल्यापासून अवघ्या महिनाभरात कारखान्याने जवळपास ८० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तसेच पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाचे पेमेंट अदा करण्याची प्रक्रिया कारखाना व्यवस्थापनाने पूर्ण केली आहे.
प्रतिटन ३ हजार ६०० रुपयांप्रमाणे देय असलेली रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना ऊस बिलाची रक्कम जमा झाल्याबाबत अधिक माहिती हवी आहे, त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.
संपूर्ण ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठविण्याचे आवाहन
यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन चेअरमन यशराज देसाई, कारखान्याचे पदाधिकारी आणि संचालक मंडळाने केले आहे. वेळेत ऊस बिल अदा करून प्रतिटन ३ हजार ६०० रुपयांची पहिली उचल दिल्याने कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.


















