सातारा जिल्ह्यात ११ हजार ७०० एकरांवर खोडवा ऊस विकास कार्यक्रम; शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जैविक निविष्ठा संच

सातारा : बदलते हवामान आणि संभाव्य एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सातारा जिल्ह्यात कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत ‘खोडवा ऊस विकास कार्यक्रम २०२६-२७’ हा महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ११ हजार ७०० एकर खोडवा ऊस क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर जैविक निविष्ठा संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या प्रकल्पाला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

जमिनीचा पोत सुधारण्यासह ऊस उत्पादकता वाढविण्यावर भर

ChiniMandi WhatsApp Channel

सातारा जिल्ह्यात सुमारे १ लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक घेतले जाते. मात्र, संभाव्य एल निनोमुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, सातत्याने एकाच पिकाची लागवड, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे घटलेले प्रमाण, हुमणी किडीचा वाढता प्रादुर्भाव आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे.विशेष म्हणजे, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्यावरून घसरून अवघे ०.३० टक्क्यांपर्यंत आले आहे. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच पाण्याचा योग्य वापर आणि ऊस उत्पादनक्षमता वाढविणे आवश्यक झाले आहे. या समस्यांवर उपाय म्हणून जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून हा विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

पाचट न जाळता मल्चिंग करण्यास प्रोत्साहन

या कार्यक्रमात ऊस पाचट जाळण्याऐवजी शेतातच त्याचे आच्छादन (मल्चिंग) करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर शेतातील अतिरिक्त पाण्याचा शास्त्रोक्त पद्धतीने निचरा करण्याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

पात्र शेतकरी गटांना प्रतिएकर १०० टक्के अनुदान

या योजनेत निवड झालेल्या लाभार्थी शेतकरी गटांना प्रतिएकर १०० टक्के अनुदानावर जैविक निविष्ठा संच दिले जाणार आहेत. आत्मा यंत्रणेकडे नोंदणीकृत ऊस उत्पादक शेतकरी गट आणि महिला शेतकरी गटांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.यामध्ये महिला शेतकरी गट, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच ऊस उत्पादकता कमी असलेल्या तालुक्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीचे माती परीक्षण करून घेणे बंधनकारक राहणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here