कोल्हापूर : हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात १० ते १५ नोव्हेंबर या पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले आहे. एकूण २५,७९५.४५१ मेट्रिक टन उसासाठी प्रतिटन ३,९०० रुपये दराने रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संजय मंडलिक यांनी दिली.
यावेळी माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळे कारखान्याने १६ दिवसांत एकूण ७१,९७० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या कालावधीत ७४,८०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा १०.४० टक्के इतका राहिला आहे. तसेच कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून २६ लाख १ हजार ३०० युनिट वीज निर्यात करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी व्हाईस चेअरमन विश्वास कुराडे, आनंदा फराकटे, शिवाजीराव इंगळे, प्रकाश पाटील, प्रधान भोजे, धनाजी बाचणकर, प्रदीप चव्हाण, नारायण चौगले, तुकाराम ढोले, संभाजी मोरे, महेश घाटगे, मंगल तुकान, अॅड. वीरेंद्र मंडलिक, अनिल कांबळे, नंदिनीदेवी घोरपडे, प्रतिभा पाटील, नेताजी पाटील, विष्णू बुवा, कार्यलक्षी संचालक सर्जेराव पाटील आणि कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

















