सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या हंगामातील ४०० रुपयांचा फरक आणि यंदाच्या हंगामात साडेतीन हजार रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. यातून तोडगा काढण्यासाठी सांगली जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, पोलिसांसमवेत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीत निर्णय झालाच नाही.
ऊसदरप्रश्नी बैठक निष्फळ ठरली. स्वाभिमानीने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर कायदा हातात घेऊ नका असे आवाहन प्रशासनाकडून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. दरम्यान, या बैठकीत कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना ऊस पाठविण्याची जबरदस्ती केली जाणार नाही असे कारखानदारांचे प्रतिनिधी अमोल पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तर कारखानदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली असा आरोप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला. चार दिवसांत पुन्हा बैठक बोलवावी अशी मागणी त्यांनी केली.