दीर्घ प्रतीक्षेनंतर मान्सून पोहोचला महाराष्ट्रात, शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

मुंबई : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी शेत तयार करणे आणि पेरणीचे काम गतीने करीत आहेत. खरीप हंगामातील पिकांची पेरणी पूर्णत: पावसावर अवलंबून असते, परंतु यावेळी मान्सून उशिरा आल्याने पिकांची पेरणीही उशिरा होत आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता या दोन्हींवर परिणाम होईल. काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस असताना पेरणी केली होती. मात्र पाऊस नसल्याने त्यांना सिंचनावर खर्च करावा लागत आहे. आता महाराष्ट्रात दमदार पाऊस सुरू झाला असून शेतकऱ्यांनीही शेतातील पेरण्यांची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात पावसाळा सुरू झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते असे सांगितले होते.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, तज्ज्ञांच्या मते खरीप हंगामात ७५-१०० मि.मी. पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, अन्यथा पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. १५ जुलैपर्यंत खरीप पिकांची पेरणी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला असून, या कालावधीपर्यंत पेरणी केल्यास पिकांवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. पीक पेरणीपूर्वी जमिनीची चाचणी करून घ्यावी, जेणेकरून गरजेनुसार खतांचा वापर शेतात करता येईल, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. उत्तर भारतात मान्सून अजून लांब आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी काही आठवडे वाट पाहावी लागेल असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, पावसाच्या विलंबामुळे, महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी तूर, उडीद आणि मूग या प्रमुख कडधान्य पिकांची पेरणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीन आणि कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here