बीडमध्ये ऊसदराच्या आंदोलनाचा भडका; प्रतिटन ४ हजार रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी शेतकरी आक्रमक

बीड : दुष्काळ आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक संकटात सापडलेले बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता हक्काच्या दरासाठी आक्रमक झाले आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हिरापूर (ता. गेवराई) येथील साईप्रसाद नॅचरल शुगर लिमिटेड आणि साईप्रसाद गूळ कारखान्याची गव्हाण बंद पाडत ऊसतोडणी आणि वाहतूक रोखली. शेतकऱ्यांनी थेट गव्हाणीत उतरून सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केल्याने कारखान्याचे कामकाज ठप्प झाले.

आहेर चिंचोली येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंगळवारी (ता. २२) क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी साईप्रसाद कारखान्यावर धडक दिली. कोणत्याही दबावाला न जुमानता आंदोलकांनी थेट गव्हाणीत प्रवेश केला. उसाला कोणतीही कपात न करता प्रतिटन ४ हजार रुपयांची पहिली उचल द्यावी आणि मागील वर्षाची थकीत एफआरपी तातडीने अदा करावी, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ChiniMandi WhatsApp Channel

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कारखाना प्रशासनाची धावपळ उडाली. सुमारे दोन तास कारखान्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारखान्याचे संचालक बळिराम गवते यांनी आंदोलकांची भेट घेत निवेदन स्वीकारले. संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ऊसदर तसेच थकीत रकमेबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी दोन दिवसांची मुदत मागितली. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, शेतकरी नेते राजेंद्र आमटे, अजय करांडे, पैलवान जानकीराम कोरडे, बाबू सुरवसे, गणेश रक्ते यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

दोन दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे म्हणाले की, दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून, त्याला उत्पादन खर्चही भागविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य दर मिळणे आवश्यक आहे.साईप्रसाद कारखान्याने दोन दिवसांत प्रतिटन ४ हजार रुपयांची पहिली उचल आणि थकीत रकमेबाबत निर्णय घेतला नाही, तर जिल्ह्यातील ऊसतोडणी रोखण्यात येईल. तसेच सर्व साखर कारखाने आणि गुऱ्हाळांचे कामकाज रोखण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा करपे यांनी दिला.

शेतकरी नेते राजेंद्र आमटे यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सांगितले की, पाण्याअभावी जळणारा ऊस शेतकऱ्यांनी पदरमोड करून जगवला आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा हक्क आहे. दोन दिवसांत मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संचालकांचे दोन दिवसांत निर्णयाचे आश्वासन

आंदोलनाबाबत साईप्रसाद कारखान्याचे संचालक बळिराम गवते म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असल्याची कारखाना प्रशासनाला जाणीव आहे. पहिली उचल आणि थकीत रकमेबाबतचा निर्णय संचालक मंडळाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे आंदोलकांच्या मागण्या आणि भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येतील. येत्या दोन दिवसांत सर्वसमावेशक आणि सकारात्मक निर्णय जाहीर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here