अहिल्यानगर : मुळा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वडाळा-बहिरोबा येथील भाऊसाहेब निवृत्ती मोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रवरासंगम येथील बाळासाहेबदादा पाटील यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर झालेल्या निवड बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज योग्य पद्धतीने चालवून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवला जाईल अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन मुकिंदपूरचे नवनिर्वाचित संचालक पांडुरंग निपुंगे व माका येथील एकनाथ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. नूतन अध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांनी आगामी गळीत हंगामासाठी सर्व सभासदांनी कारखान्यालाच ऊस द्यावा, असे आवाहन केले. गळीत हंगामात सर्व शेतकऱ्यांचे समाधान होईल, या पद्धतीने शेती विभागातर्फे नियोजन केले जाईल. कारखान्याचा विस्तारवाढ केली असल्याने सर्वानी ऊस लागवडीला प्राधान्य द्यावे असे सांगण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख, वेदांताचार्य देविदास महाराज, माजी अध्यक्ष नानासाहेब तुवर, नंदकुमार पाटील, मदन डोळे, कारभारी जावळे, भाऊसाहेब निमसे, प्रभाकर कोलते, भाऊसाहेब लांडे व मान्यवर उपस्थित होते. रितेश टेमक यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी आभार मानले.


















