अहिल्यानगर : जिल्ह्यात ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असताना साखर कारखानदारांकडून मात्र अद्याप ऊसदर जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने साखर तारणावर प्रतिक्विंटल ४ हजार रुपये मूल्यांकनानुसार उचल देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २० नोव्हेंबर रोजी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाला चार दिवस उलटूनही जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही.
जिल्हा बँकेकडून साखर तारणावर किती उचल मिळणार, याबाबत निर्णय होत नसल्याने कारखानदारांनी पहिली उचल जाहीर करण्यास विलंब केला होता. विशेष म्हणजे, ऊस गाळप सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला असतानाही अनेक शेतकऱ्यांना गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळालेले नाहीत. अखेर जिल्हा बँकेने साखरेच्या मूल्यांकनानुसार प्रतिक्विंटल ४ हजार रुपये दराने उचल देण्याचा निर्णय घेतला. राज्य सहकारी बँकेच्या तुलनेत हा दर ५०० रुपयांनी कमी असला, तरी जिल्ह्यातील कारखान्यांसाठी आर्थिक उचल मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, तरीही कारखानदारांकडून ऊसदर जाहीर करण्याबाबत उदासीनता कायम आहे.
४ हजारांच्या पहिल्या उचलीसाठी शेतकरी संघटना आक्रमक
गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात ऊसदरासाठी विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ४ हजार रुपये मिळावी, अशी मागणी संघटनांनी लावून धरली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील थोरात आणि काळे या दोन साखर कारखान्यांनी प्रतिटन ३ हजार २०० रुपये, तर घुले, अशोक, ढाकणे, मुळा आणि अगस्ती या कारखान्यांनी ३ हजार १०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. मात्र, हा दर शेतकरी संघटनांना मान्य नसून त्या ४ हजार रुपयांच्या मागणीवर ठाम आहेत.
सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातही प्रतिटन ४ हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी करण्यात आली.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबर रोजी साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ऊसदराचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
३ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपये ऊसदर मिळण्याची शक्यता
जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ऊसदरासंदर्भात महत्त्वाचे संकेत दिले होते.राज्य सहकारी बँकेने साखर तारणावर प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपयांची उचल निश्चित केली असली, तरी जिल्हा बँक कारखान्यांना साखरेच्या मूल्यांकनानुसार प्रतिक्विंटल ३ हजार ८०० रुपयांपर्यंत उचल देऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
या आर्थिक गणितानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत ऊसदर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखानदारांकडूनही याच दराच्या आसपास पहिली उचल जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र, शेतकरी संघटनांची ४ हजार रुपये पहिल्या उचलीची मागणी आणि कारखानदारांची आर्थिक गणिते यामध्ये ताळमेळ कसा बसणार, याकडे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















