अहिल्यानगर : नेवासे तालुक्यातील मुळा आणि ज्ञानेश्वर या दोन साखर कारखान्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ज्येष्ठ नेते व संस्थापक यशवंतराव गडाख यांच्या मुळा साखर कारखान्यासाठी यापूर्वी १८२ अर्जाची विक्री झाली, तर सोमवारी ३५ अर्ज विकले गेले आहेत. ‘मुळा’ करिता सत्ताधारी गटाकडून दोन दिवसांपूर्वी अवघे तीन अर्ज दाखल असून, आज एकही अर्ज दाखल झाला नाही. तर संस्थापक स्व. मारुतराव घुले यांच्या ज्ञानेश्वर साखर कारखान्यासाठी अर्ज विक्री व दाखल करण्यासाठी झुंबड उडाल्याने सभासद आचंबित झाले आहे. ज्ञानेश्वर कारखान्यासाठी १०३ अर्ज दाखल झाले आहेत. मुळा कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी (ता.२) रोजी शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, ‘ज्ञानेश्वर’साठी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी आमदार नरेंद्र घुले यांच्यासह सुधाकर नरवडे, नारायण म्हस्के, देसाई देशमुख, दत्तात्रेय काळे, अशोक मंडलिक, विठ्ठल अभंग, जनार्दन शेळके, विक्रम चौधरी व जनार्दन पटारे या प्रमुख व्यक्तींनी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही कारखान्यांची यंत्रणा अर्ज दाखल करण्यासाठी सक्रिय आहे. आमदार विठ्ठल लंघे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्याकडून प्रत्येक गटात उमेदवार चाचपणीला वेग आला आहे. विरोधी गटाने सोशल मीडियावर दंड थोपटले असल्याने सभासद, कार्यकर्ते आणि गावागावांतील ग्रामस्थांत काय होणार, कसे होणार याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारखान्यासाठी आतापर्यंत शेवगाव गट ११, शहरटाकळी गट ४, कुकाणे गट २४, नेवासे गट ७, वडाळा गट १३, पणन संस्था गट ३, अनुसूचित जाती गट ३, महिला गट ४, इतर मागासवर्गीय गटातून २२ व विशेष मागास प्रवर्गातून ५ अर्ज दाखल झाले आहेत.


















