अहिल्यानगर : मालपाणी लॉन्स येथे रविवारी (दि.२६) स्वराज्य सैनिक कल्याण संस्थेच्यावतीने कारगिल दिनाच्या निमित्ताने वीरमाता, वीरपत्नी व समाजभूषण पुरस्कारानिमित्त कार्यक्रम झाला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, रामहरी कातोरे, मेजर भाऊसाहेब पोखरकर, तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर, कॅप्टन सुभाष कुडेकर, सुनील थोरात, प्रा. बाबा खरात, किसनभाऊ हासे, जितेश लोढा, युवराज गांजवे, रोहिणी कोटकर उपस्थित होते. यावेळी संगमनेरमध्ये स्वातंत्र्य सैनिकाचे सुंदर स्मारक व्हावे, याकरीता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ४२ गुंठे जागा दिली जाणार असल्याची घोषणा थोरात यांनी केली.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाच्या रक्षणाकरीता अनेक सैनिकांनी त्याग, बलिदान केला आहे. या सर्वांप्रती देशवासीयांना सदैव कृतज्ञता आणि अभिमान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात पहिले महायुद्ध व दुसऱ्या महायुद्धातही भारतीय सैनिकांनी मोठे शौर्य दाखवले. यावेळी डॉ. सुधीर तांबे यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये सैनिकांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्याकरीता जी समिती काम करते, त्यासाठी ४२ गुंठे जागा कारखान्याने दिल्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी डोंगरगाव येथील हरिभाऊ उगले हे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करणयात आला. वीरपत्नी वैशाली बडे, वीरपत्नी वर्षा घोडेकर, वीरपत्नी सुरेखा पवार, वीरपत्नी मनीषा गुंजाळ, वीरपत्नी मंगल वलटे, वीरपत्नी सिंधुताई मनसुख आणि वीरमाता लहानुबाई ढगे यांना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भानुदास पोखरकर, प्रा. बाबा खरात, सुभाष कुडेकर यांनी मनोगते व्यक्त केली. तालुकाध्यक्ष प्रकाश कोटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जितेंद्र जोशी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील थोरात यांनी आभार मानले.


















