अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांची कामधेनू आहे. कारखान्यासाठी अधिकाधिक ऊस मिळविण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवाराचे मतपरिवर्तन करा, असे आवाहन कारखान्याचे नूतन व्हाइस चेअरमन आदिनाथ झुराळे यांनी केले. मुठेवाडगांव येथे लोकसेवा मंडळ, ऊस उत्पादक सभासद व कारखाना कामगारांच्यावतीने संत तुळशीराम महाराज मंदिर सभामंडपात व्हा. चेअरमन झुराळे यांचा सत्कार झाला. ज्येष्ठ कार्यकर्ते संपतराव मुठे अध्यक्षस्थानी होते.
आदिनाथ झुराळे म्हणाले की, कारखान्यात लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी आपली व्हा. चेअरमनपदी बिनविरोध निवड करून सभासद कामगार यांची सेवा करण्याची संधी दिली. या पदाचे माध्यमातून आपण ऊस उत्पादक सभासद, कारखाना कामगार यांच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करू. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागात गावोगावच्या कार्यकारी सोसायट्यांनंतर सहकारात अशोक सहकारी साखर कारखाना हा मोठा प्रकल्प आ. भानुदास मुरकुटे यांच्या अधिपत्याखाली टिकून आहे. याप्रसंगी माजी व्हा चेअरमन बाबासाहेब आदिक, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव मुठे, भाऊसाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक वीरेश गलांडे, निवृत्त नायब तहसीलदार बाबासाहेब गोसावी, अॅड. दिलीप मुठे, माजी सरपंच भाऊसाहेब मुठे, गणेश भाकरे, दिपक झुराळे, बाबासाहेब मुठे, लक्ष्मणराव मुठे, रामभाऊ महाराज मुठे, लहानु मुठे, मल्हारी मुठे आदी उपस्थित होते. भिकचंद मुठे यांनी सूत्रसंचलन केले. माजी सरपंच शिवाजी मुठे यांनी आभार मानले.


















