अहिल्यानगर : गणेश साखर कारखान्याचे हक्काचे ३८ कोटी परत घेतल्याशिवाय शांत बसणार नाही – आ. विवेक कोल्हे

अहिल्यानगर : गणेश साखर कारखाना आठ वर्षे ‘प्रवरा’ने चालवला. करार संपल्यानंतरदेखील एक वर्ष विखे-पाटील यांच्या विचारांच्या संचालकांनी कारखाना चालवला. डॉ. सुजय विखे-पाटील यांना सह्यांचा अधिकार दिला. ‘गणेश’चे हक्काचे ५ कोटी रुपये राहुरी कारखान्याला देण्यात आले. यामुळे मोठे मन करुन, त्यांनी ‘गणेश’च्या हक्काचे सभासदांचे ३८ कोटी रुपये परत करावेत, असे आवाहन आमदार विवेक कोल्हे यांनी केले. गणेश कारखान्याचे रोलर पूजन उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते. श्रीगणेश साखर कारखाना रोलर पूजनाला स्वतः बसलो. कारण जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवली आहे. जबाबदारी झटकणार नाही. आमच्या ‘श्रीगणेश’च्या सभासदांचे ३८ कोटी रुपये आम्ही परत घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असे आमदार विवेक कोल्हे यांनी ठणकावून सांगितले.

आमदार कोल्हे म्हणाले की, साखर उद्योग अडचणीत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांची शिष्ठमंडळासह भेट घेणार आहे. ‘श्रीगणेश’चा गाळप हंगाम सर्वांच्या सहकार्याने यशस्वी करायचा आहे. यापूर्वीचे हंगाम प्रतिकूल परिस्थितीतदेखील यशस्वी केले. यापूर्वी सत्ताधारी पक्षात होतो, मात्र आता सत्तेतदेखील आहे. यापुढे ‘श्रीगणेश’ला कुठल्याही अडचणी येणार नाहीत, आल्या तरी त्या सोडवण्यासह अडचणींना जशास तसे उत्तर देण्याची तयारी ठेवू, असे त्यांनी स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel

ते म्हणाले, कर्मचाऱ्यांचे प्रश्न बहुतांश सोडवले आहेत. राजकीय व मानवनिर्मित अडचणीतून श्रीगणेश कारखाना अतिशय संघर्षातून पुढे नेत आहे, असे सांगत, यंदा ३.५ लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. तांत्रिक अडचणींमुळे मागील काळात झालेल्या त्रुटी दूर करणार आहे. ‘गणेश’च्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखाने घेऊन जातात. त्याचा फटका यापूर्वी बसला. त्यावर उपाययोजना करणार आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून ‘श्रीगणेश’ला आर्थिक अडचणीत मदत करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेत समविचारी मंडळी येवून, निवडणूक बिनविरोध होईल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून सभासदांनी दिलेला निकाल मान्य करायचा असतो मात्र निकालाच्या दिवशीच रेकॉर्ड पळवा पळवी येथे झाली होती. १७ कोटी रुपयांचे आम्हाला घेणे आहे, अशी नोटीस आमच्या संचालक मंडळाला देण्यात आली होती. त्यानंतर थेट ८१ कोटी रुपये घेणे आहे, असा लवाद टाकला. लवादात आपण आपलेच २८ कोटीपेक्षा अधिक रक्कम त्यांच्याकडून घेणे निघते असे नमूद करण्यात आले, मात्र त्यावर पुढे काहीही झाले नाही. आम्ही न्यायालयात लढाई लढत आहे. यासह जिल्हा बँकेतीलदेखील विरोधकांनी कर्जासाठी अडचणी आणल्या, असे आमदार कोल्हे म्हणाले. यावेळी चेअरमन सुधीर लहारे म्हणाले की, नेते बाळासाहेब थोरात व आमदार विवेक कोल्हे आमच्या पाठीशी भक्कम उभे आहेत. यावेळी स्वामी सहजानंद भारती आश्रमचे मठाधिपती चैतन्यगिरी महाराज, व्हा. चेअरमन विजय दंडवते, ‘श्रीगणेश’चे संचालक, कार्यकारी संचालक घुगरकर, एम.डी. जी. बी. शिंदे, अधिकारी, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here