नवी दिल्ली: एल निनोच्या प्रभावामुळे देशातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह तसेच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संयुक्तपणे आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, कृषी मंत्रालय तसेच इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत अमित शाह यांनी सांगितले की, एल निनोमुळे देशातील काही भागांमध्ये कमी पावसाची आणि संभाव्य दुष्काळाची परिस्थिती केंद्र सरकार सातत्याने लक्षात ठेवून आहे. त्यांनी कृषी मंत्रालयासह संबंधित मंत्रालयांना सतर्क राहण्याचे निर्देश देत राज्य सरकारांशी समन्वय साधून शेतकऱ्यांना हंगामासाठी योग्य पिकांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यास सांगितले.
गृहमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला देशातील सर्व जलाशयांतील पाणीसाठ्यांवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच प्रभावित भागांमध्ये कमी पाणी लागणाऱ्या चारा पिके, भरड धान्य (मिलेट्स) आणि कडधान्ये यांसारख्या पर्यायी पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. याशिवाय, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला देशभरात अखंड आणि पुरेसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना माहिती दिली की, देशात तांदूळ, गहू यांसह अत्यावश्यक अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही सध्या स्थिर आहेत.
या बैठकीला कृषी व शेतकरी कल्याण, जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन, ग्राहक व्यवहार, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, पर्यावरण, वन व हवामान बदल, ऊर्जा, ग्रामीण विकास तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांचे सचिव उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), भारतीय हवामान विभाग (IMD), केंद्रीय जल आयोग, भारतीय कृषी संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र यांचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीत सहभागी झाले.
दरम्यान, अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाला (IMCT) आसाम आणि अरुणाचल प्रदेश येथे पाठवण्याचे निर्देश दिले. अलीकडील अतिवृष्टी, अचानक आलेले पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे आणि मूल्यांकन करण्यासाठी हे पथक दौरा करणार आहे. अधिकृत माहितीनुसार, आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली असून, अरुणाचल प्रदेशातील अनेक डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान पायाभूत सुविधा, शेती आणि नागरिकांच्या वस्त्यांचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहून त्याचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे.


















