पुणे : जिल्ह्यातील भीमाशंकर, सोमेश्वर, नीरा भीमा आणि विघ्नहर या चार सहकारी कारखान्यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नवी दिल्ली येथे २२ सप्टेंबरला सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती एनएफसीएसएफचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. देशातील २६० सहकारी कारखान्यांपैकी सन २०२४-२५ मध्ये ८८, तर २०२५-२६ साठी १०२ कारखान्यांनी प्रस्ताव दिले होते. महाराष्ट्रातील कारखान्यांनी २१ पारितोषिके पटकावली आहेत.
गळीत हंगाम २०२४-२५ साठी ‘राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना’ हा सर्वोच्च पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे. याच हंगामासाठी पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास देशाच्या उच्च उतारा विभागातून तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर, २०२५-२६ या हंगामासाठी नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यास उच्च उतारा विभागातून प्रथम क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार मिळाला आहे. याच विभागातून तृतीय क्रमांकाचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास मिळाला आहे. ‘उत्कृष्ट सहकारी बँक’ हा पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मिळाला आहे. जिल्हा बँकेने साखर कारखान्यांना आर्थिक आधार देऊन उल्लेखनीय कार्य केल्याने हा पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारचे मुख्य संचालक (साखर), कानपूरचे शर्करा संस्थान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, एनएफसीएसएफचे कार्यकारी संचालक, कारखान्यांचे कार्यकारी संचालक यांच्या समितीने प्रस्तावांचे मूल्यमापन केले.


















