बीड : शेतकऱ्याने केला उसामध्ये शुगर फ्री गहू, मका आंतरपिकाचा यशस्वी प्रयोग

बीड : ऊस पिकातील मोकळ्या जागेचा योग्य उपयोग करण्याच्या उद्देशाने गाढे पिंपळगाव (ता. परळी) येथील प्रगतीशील शेतकरी लक्ष्मण राडकर व त्यांचा मुलगा गोवर्धन यांनी आंतरपिकाचा वेगळा प्रयोग केला. गोवर्धन यांनी बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्रात जाऊन आंतरपीक पद्धतीचे विशेष प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार, त्यांनी उसाच्या ओळींमधील मोकळ्या जागेत शुगर फ्री गहू व मका पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. राडकर यांनी केलेला ‘शुगर फ्री’ गहू उत्पादनाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. ऊस पिकामध्ये या आंतरपिकातून त्यांनी अडीच लाखांचे उत्पन्न मिळविले. कमी खर्चात अधिक उत्पादनाच्या या तंत्राचे कौतुक केले जात आहे.

राडकर यांनी सध्याच्या बाजारभावानुसार गव्हापासून सुमारे दोन लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे, ऊस हे मुख्य पीक कायम ठेवत अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यात राडकर यशस्वी ठरले. या प्रयोगामुळे एकाच शेतातून बहुपीक पद्धतीचा लाभ घेत उत्पादन खर्च कमी ठेवत उत्पन्न वाढविता येते, हे स्पष्ट झाले आहे. राडकर यांनी आपल्या चार एकर शेतात पाच फूट अंतरावर ऊस लागवड केली. त्यामध्ये टोकण यंत्राच्या साह्याने अचूक अंतर राखत गव्हाची पेरणी केली. योग्य प्रमाणात सेंद्रिय, रासायनिक खतांचा वापर, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा व कीडरोग नियंत्रणाची काळजी घेतली. नियोजनबद्ध शेतीमुळे दोन्ही पिकांना चांगली वाढ मिळाली. गव्हाचे सुमारे वीस क्विंटल, तर मक्याचे साठ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. शुगर फ्री गहू मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त असल्याने बाजारात त्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे चांगला दर मिळत असल्याचेही लक्ष्मण राडकर यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here