बीड : महेश साखर कारखान्यात कोट्यवधींची मशिनरी चोरी झाल्याचा माजी आमदार धोंडे यांचा आरोप

बीड: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आष्टी तालुक्याची ‘कामधेनू’ असलेला कडा येथील महेश सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करणे अत्यावश्यक आहे. यासाठीची तयारी सुरू आहे. यावेळी कारखान्यातील कोट्यवधी रुपयांची महागडी मशिनरी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील संशयितांची नावेही निष्पन्न झाली असून, लवकरच पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. आष्टी येथील भगवान महाविद्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अशोक साळवे उपस्थित होते.

माजी आमदार धोंडे म्हणाले की, अनेक आर्थिक, प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींवर मात करत प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या कारखान्यामुळे शेतकरी, वाहतूकदार, पूरक उद्योग आणि स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. परिणामी, आष्टी तालुक्याच्या नवसंजीवनी मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कारखान्याचे काम सुरू असताना अज्ञात चोरट्यांनी अत्यंत महागडी आणि जड मशिनरी लंपास केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ही चोरी कोट्यवधी रुपयांची आहे. या प्रकरणातील काही संशयितांची नावे समोर आली असून, त्यांच्याविरुद्ध लवकरच अधिकृत तक्रार दाखल केली जाणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here