बीड : घाटसावळी (ता. बीड) येथील सुरेश पाटील शुगर अॅण्ड अॅग्रो प्रा.लि. या नवीन साखर कारखान्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी २०२६-२७ च्या पहिल्या गळीत हंगामासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदारांचा रविवारी (ता. १२) सकाळी अकरा वाजता मेळावा कारखान्यात आयोजित करण्यात आला आहे. संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस गाळप नियोजन, मजुरांच्या समस्या आणि वाहतूक व्यवस्थेवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
सध्या कारखान्यात यंत्रसामग्रीची चाचणी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया वेगाने सुरू असून, येत्या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्षम तोडणी मजूर व वाहतूक व्यवस्था आवश्यक असल्याने, या मेळाव्यात दरनिर्धारण, अटी-शर्ती आणि करार प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.कार्यकारी संचालक समीर पाटील यांनी परिसरातील तसेच बाहेरील अनुभवी कंत्राटदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. या मेळाव्यामुळे आगामी गळीत हंगामाला गती मिळणार असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


















