बी़ड : दरवर्षी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होत असते. यंदा दिवाळीपूर्वीच ऊसतोडीला वेग आल्यामुळे गावच्या गाव ओस पडू लागली आहेत. रोजगाराच्या शोधात अनेक कामगार परराज्यातही जात आहेत. टाकरवणसह परिसरात तांड्यांची संख्या मोठी असून, ऊसतोडीची मुकादमाकडून अनामत रक्कम (उचल) घेऊन सहा महिन्यांच्या करारावर हे मजूर स्थलांतरित होतात. हे कामगार चंद्रभागा, नीरा-भीमा, सोमेश्वर, बारामती, सातारा या महाराष्ट्रातील कारखान्यांसह कर्नाटकातील अनेक साखर कारखान्यांवर ऊसतोडणीसाठी जातात. यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती असून साखर कारखानेही लवकर सुरू झाले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना उसाच्या फडातच दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे.
माजलगाव तालुक्यात टाकरवण व परिसरामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या लक्षणीय आहे. दरवर्षी हे कामगार दिवाळीचा सण स्वतःच्या घरी, गावात साजरा करून मगच ऊसतोडीसाठी बाहेर पडतात. मात्र, यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीतील उत्पन्नात मोठी घट झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. नापिकीमुळे यंदा अनेक अल्पभूधारक शेतकरीदेखील ऊसतोडीसाठी स्थलांतर करत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. एकदा गाव सोडले की, ऊसाचा हंगाम संपेपर्यंत त्यांना ऊसाच्या फडातच ऊन, वारा आणि थंडीचा सामना करत, अपुऱ्या सुविधांमध्ये जीवन जगावे लागते. याच फडात आता त्यांची दिवाळी साजरी होणार आहे. ऊसतोड कामगारांना कष्टानुसार योग्य मजुरी मिळावी आणि कारखान्याच्या ठिकाणी राहण्या – खाण्याच्या, तसेच आरोग्याच्या किमान प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ऊसतोडणी कामगार संघटनांकडून वारंवार केली जात आहे. मात्र, या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याची खंत ऊसतोड कामगार व्यक्त करीत आहेत.


















