बेळगाव : ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने बुधवारी (ता. ४) उसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याचा निर्णय जाहीर केला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रशासनाने जाहीर केलेला दर शेतकरी संघटनांना मान्य नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काही शेतकरी नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला असून, आंदोलनकर्त्या नेत्यांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे ३,६०० रुपयांचा दर स्वीकारायचा की आंदोलन सुरूच ठेवायचे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची चार हजार रुपये दराची मागणी
बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्री जारकीहोळी यांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि मागण्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी प्रतिनिधींनी उसाला किमान प्रतिटन चार हजार रुपये दर देण्याची मागणी केली. सध्याची दुष्काळी परिस्थिती, वाढता शेती उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन योग्य दर निश्चित करावा, अशी भूमिका काही नेत्यांनी मांडली.त्यानंतर पालकमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना आपापसांत चर्चा करून एकमताने निर्णय घेण्याची संधी दिली. मात्र, दराच्या मुद्द्यावर नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. यानंतर पालकमंत्र्यांच्या कक्षात प्रभारी जिल्हाधिकारी राहुल शिंदे, उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन आणि शेतकरी नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
कारखानदारांची ३,६०० रुपये दराला संमती
बैठकीनंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार राजू सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन निर्णयाची माहिती दिली. गेल्या दोन दिवसांपासून साखर कारखानदारांशी दराबाबत चर्चा सुरू होती. सुरुवातीला कारखानदारांनी प्रतिटन ३,५०० रुपये दर देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तीव्रता आणि मागण्यांचा विचार करून प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याची सूचना करण्यात आली. कारखानदारांनीही या दराला संमती दिल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.दरम्यान, गुरुवारी (ता. ५) बेळगाव येथे नियोजित असलेले जेलभरो आंदोलन मागे घ्यावे आणि साखर कारखाने सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी शेतकरी संघटनांना केले.
काही शेतकरी नेत्यांचा निर्णयाला तीव्र विरोध
पालकमंत्री जारकीहोळी यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निर्णयाला संमती दर्शविली, तर काही शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी ३,६०० रुपये प्रतिटन दर मान्य नसल्याचे स्पष्ट केले. ‘३,६०० रुपयांचा दर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही,’ अशी ठाम भूमिका काही नेत्यांनी घेतली. शेतकऱ्यांची चार हजार रुपये दराची मागणी कायम असल्याने आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चन्नम्मा चौकातील आंदोलनाला पोलिसांचे निर्बंध
ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी गुरुवारी (ता. ५) बेळगावातील चन्नम्मा चौकात आंदोलन करण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर निर्बंध जारी केल्याची माहिती दिली. त्यामुळे गुरुवारच्या आंदोलनाबाबत शेतकरी संघटना कोणती भूमिका घेतात आणि प्रशासनाच्या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


















