भीमा पाटस कारखान्याच्या गोदामाला लागलेली आग संशयास्पद: रमेश थोरात यांचे आरोप

दौंड ( पुणे) : भीमा सहकारी कारखान्याने घेतलेल्या कर्जापोटी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे एकूण १ लाख १६ हजार ४९४ क्विंटल साखर तारण आहे. त्यापैकी सन २०१३ – २०१४ व सन २०१४ – २०१५ या दोन गळित हंगामातील दहा हजार पोत्यांचे लिलाव करण्याची जाहिरात २२ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित झाली होती. जाहिरात प्रकाशित झाल्याच्या तिसऱ्या दिवशी कारखान्याच्या गोदामाला मध्यरात्री आग लागली. सदर गोदामात ६९ हजार ३७६ क्विंटल साखरेचा साठा होता. आगीनंतर पंचनामा करण्यात आला परंतु पंचनाम्याचा अहवाल बँकेला आजअखेर प्राप्त झालेला नाही, असा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी केला आहे.

रमेश थोरात म्हणाले, “बँकेने वसुलीसाठी तारण साखरेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर तीन दिवसांत आग लागली.तारण साखर असलेल्या गोदामाला पाच वर्षात एकदाही आग लागली नाही परंतु लिलाव करण्याची वेळ आल्यानंतर आग लागल्याने ती संशयास्पद आहे. गोदामात वीजजोड नाही त्यामुळे शॉर्टसर्किटचा प्रश्न नाही. आगीनंतर पाणी मारून आग विझवताना आग न लागलेला साखरेचा साठा सुध्दा पाण्याने खराब करण्यात आला असावा, अशी शंका आहे. सदर आगीची कसून चौकशी करण्याची मागणी पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केलेली आहे.”
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने भीमा सहकारी साखर कारखान्याला भांडवली कर्ज, मध्यम मुदत कर्ज व अन्य भांडवली कर्ज दिलेले आहे. परंतु परतफेड न झाल्याने एप्रिल २०१७ पासून कारखान्याचे संपूर्ण कर्ज अनुत्पादक कर्ज (नॉन परफॉर्मिंग असेट) झाले असून बँकेला कारखान्याकडून १३० कोटी रूपये येणे आहे. याबाबत राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व चौकश्यांना तयार असल्याचे सांगत या आगीची पुणे पोलिसांमार्फत सर्व चौकशी सुरू असून त्यातून सर्व तथ्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here