नवी दिल्ली : हीरो मोटोकॉर्पच्या पहिल्या फ्लेक्स-फ्यूएल मोटरसायकल मॉडेल्सचे बुधवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या मोटरसायकल पेट्रोल आणि इथेनॉल या दोन्हीच्या मिश्रणावर चालविण्यास सक्षम आहेत. जयपूर येथील हीरो मोटोकॉर्पच्या सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजीमध्ये विकसित केलेल्या, लोकप्रिय स्प्लेंडर+ आणि एचएफ डिलक्स मोटरसायकलच्या या नवीन मॉडेल्समुळे भारताच्या स्वच्छ आणि स्थानिक पातळीवर उत्पादित इंधनाच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. ग्राहकांना इंधनाबाबत अधिक लवचिकता देण्यासाठी आणि आयात जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या त्यांचे मोठे योगदान असेल.
या अनावरण सोहळ्यात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी भारत सध्या आपल्या जीवाश्म इंधनाच्या गरजेपैकी ८७ टक्के आयात करतो, त्यामुळे पर्यायी इंधनाकडे वळणे ही एक आर्थिक आणि धोरणात्मक गरज आहे असे सांगितले. ते म्हणाले की, सरकारचा भर प्रदूषण कमी करू शकणाऱ्या आणि इंधनाशी संबंधित खर्च देशातच ठेवू शकणाऱ्या स्वदेशी, किफायतशीर आणि स्वच्छ इंधनांना प्रोत्साहन देण्यावर आहे. इथेनॉल आणि इतर जैवइंधनांच्या व्यापक वापराचा फायदा शेतकरी, ग्रामीण समुदाय, शेतमजूर आणि व्यापक अर्थव्यवस्थेला होईल. फ्लेक्स-फ्यूएलचा टप्पा आता दुचाकींच्या पलीकडे विस्तारत आहे. मारुती सुझुकीतर्फे फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असलेले भारतातील पहिले प्रवासी वाहन गुरुवारपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे.
गडकरी यांनी इथेनॉल हे निकृ्ष्ट इंधन असल्याटी टीका फेटाळून लावली. ते म्हणाले की, इथेनॉलवर चालणारी वाहने पारंपरिक पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांइतकीच शक्ती आणि टॉर्क देतात असे तांत्रिक मूल्यांकनातून दिसून आले आहे. या मोटरसायकल पेट्रोल आणि इथेनॉल दोन्हीवर चालू शकतात. इथेनॉल हे निकृष्ट इंधन नाही. ग्राहकांना अनेक इंधन पर्याय उपलब्ध झाल्याने फायदा होईल हे लक्षात घेतले पाहिजे. देश आता केवळ उसावर आधारित कच्च्या मालावर अवलंबून नाही. मका, तुटलेला तांदूळ आणि शेतीतील अवशेषांपासून इथेनॉलचे उत्पादन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी निर्माण होत आहेत.
गडकरी यांनी पानिपतमध्ये भाताच्या पेंढ्यासह पिकांच्या अवशेषांचे इथेनॉल आणि शाश्वत विमान इंधनात (एसएएफ) रुपांतर करणाऱ्या प्रकल्पाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, यातून, शेतीतील कचऱ्याचे मौल्यवान ऊर्जा उत्पादनांमध्ये कसे रुपांतर करता येते, हे दिसते. सरकार इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी), इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि हायड्रोजन यांसारख्या विविध पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. कच्च्या तेलाची आयात कमी करणे, ऊर्जा सुरक्षा सुधारणे आणि अधिक मजबूत हरित अर्थव्यवस्था उभारणे हा यामागील उद्देश आहे. हरित अर्थव्यवस्था, जैव-अर्थव्यवस्था आणि जैवइंधन हे आपले भविष्य आहे.
यावेळी हिरो मोटोकॉर्पचे प्रतिनिधित्व करताना, हर्षवर्धन चितळे यांनी कंपनीच्या फ्लेक्स-फ्यूएल विभागातील प्रवेशाला भारताच्या जैवइंधन परिसंस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, या मोटरसायकल्स पूर्णपणे भारतात विकसित केल्या गेल्या आहेत. स्थानिक गरजांनुसार भविष्यासाठी सज्ज आहेत. ही उत्पादने सरकारच्या आत्मनिर्भरता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतात.या मोटरसायकल्समध्ये आयात केलेल्या घटकांचे प्रमाण नगण्य आहे. पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी धोरणांच्या पाठिंब्याने, कंपनी ग्राहकांसाठी किमती परवडणाऱ्या ठेवण्याचा प्रयत्न करेल.


















