ताश्कंद/रिओ डी जानेरो : आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटने (IATA) ने म्हटले आहे की, शाश्वत विमान इंधन (SAF) उत्पादनाच्या क्षेत्रात ब्राझीलमध्ये जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे. रिओ डी जानेरो येथे झालेल्या आयएटीएच्या 82 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती देण्यात आली. IATA च्या मते, SAF उत्पादनात वाढ झाल्यास जागतिक विमान वाहतुकीतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होईल. याशिवाय ब्राझीलची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि आर्थिक विकासासाठी नवीन संधी निर्माण होतील.
IATA च्या अंदाजानुसार, 2050 पर्यंत विमान वाहतूक क्षेत्राला शून्य निव्वळ कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सुमारे 50 कोटी टन SAF ची आवश्यकता भासणार आहे. ब्राझीलकडे जगातील सर्वात मोठ्या जैविक कच्च्या मालाच्या (बायोमास) साठ्यांपैकी एक असून, शतकाच्या मध्यापर्यंत सुमारे 18 कोटी टन फीडस्टॉक उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच्या आधारे सुमारे 6 कोटी टन एसएएफचे उत्पादन शक्य होऊ शकते. IATA अंदाजानुसार, शाश्वत पद्धतीने उत्पादित ऊस-आधारित इथेनॉल, वनस्पती तेल आणि वापरलेल्या खाद्यतेलांपासून मिळणारा कच्चा माल 2030 पर्यंत 1.8 कोटी टनांपर्यंत पोहोचू शकतो. या प्रमाणातून सुमारे 1.2 कोटी टन SAF चे उत्पादन होऊ शकते, जे 2026 मधील अपेक्षित जागतिक उत्पादनाच्या सुमारे पाचपट आहे.
सध्या ब्राझीलमध्ये SAF उत्पादनाशी संबंधित सुमारे 15 प्रकल्प विकसित होत आहेत. हे प्रकल्प यशस्वी झाल्यास देशाच्या वार्षिक एसएएफ उत्पादन क्षमतेत सुमारे 20 लाख टनांची भर पडू शकते.IATA चे महासंचालक विली वॉल्श यांनी सांगितले की, स्वच्छ ऊर्जा व्यवस्था, मुबलक फीडस्टॉक संसाधने, विकसित पायाभूत सुविधा आणि जैवइंधन उत्पादनाचा दीर्घ अनुभव हे ब्राझीलचे प्रमुख बलस्थान आहेत. या घटकांमुळे विमान वाहतुकीच्या डीकार्बोनायझेशनमध्ये ब्राझील जागतिक नेतृत्व करू शकतो.
संघटनेने ब्राझीलच्या विकसित इथेनॉल उद्योगाचा आणि विद्यमान रिफायनिंग क्षमतेचाही विशेष उल्लेख केला आहे. या क्षमतांच्या आधारे वनस्पती तेल प्रक्रिया आणि इथेनॉलपासून विमान इंधन निर्मिती यांसारख्या विविध तांत्रिक मार्गांनी एसएएफ उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवता येऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात ब्राझील केवळ देशांतर्गत एसएएफची गरज भागवणार नाही, तर या इंधनाचा प्रमुख निर्यातदारही बनू शकतो. यामुळे कृषी, लॉजिस्टिक्स, कच्चा माल प्रक्रिया आणि निर्यात क्षेत्रांनाही चालना मिळेल.
मात्र, ही क्षमता पूर्णपणे साकारण्यासाठी उत्पादन सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक, कच्च्या मालाच्या प्रक्रियेतील तांत्रिक प्रगती, वित्तपुरवठा यंत्रणांमध्ये सुधारणा आणि उत्पादकांसाठी सरकारी प्रोत्साहन योजना आवश्यक असल्याचे आयएटीएने नमूद केले आहे. संघटनेने राष्ट्रीय नियमांना आंतरराष्ट्रीय शाश्वतता मानकांशी सुसंगत करण्यावर तसेच ‘बुक-अँड-क्लेम’ पद्धतीअंतर्गत एसएएफ प्रमाणपत्र व्यापार प्रणाली लागू करण्यावर भर दिला आहे. अनिवार्य एसएएफ वापर नियम लागू होण्यापूर्वी पुरेशी उत्पादन क्षमता निर्माण करणे गरजेचे असल्याचेही ‘आयएटीए’ने स्पष्ट केले.
‘आयएटीए’च्या शाश्वतता विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ मेरी ओवेन्स थॉमसन यांनी सांगितले की, एसएएफ क्षेत्रातून ब्राझीलला मिळू शकणारे आर्थिक लाभ देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन घडवू शकतात. उत्पादन साखळीचा विस्तार आणि कॉर्सिया कार्यक्रमासह आंतरराष्ट्रीय उपक्रमांशी सुसंगत राष्ट्रीय धोरणे राबविल्यास ब्राझील जागतिक एसएएफ बाजारपेठेत आपली स्पर्धात्मक आघाडी अधिक मजबूत करू शकेल.


















