नवी दिल्ली : ब्राझीलच्या दक्षिण-मध्य भागातील साखर कारखान्यांनी एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात सुमारे १९० लाख टन उसाचे गाळप केले. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत १९.६७टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती युनिका या उद्योग संस्थेने दिली आहे. या वाढीमुळे इथेनॉल उत्पादनात ३३.३२ टक्क्यांची वाढ होऊन ते १.२३ अब्ज लिटरवर पोहोचले आहे. आता जागतिक स्तरावरील युद्ध परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ब्राझीलने यंदाच्या साखर हंगामाची जोरदार सुरुवात केली आहे. नवीन ऊस गाळप हंगाम सुरू होताच ब्राझीलमध्ये इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. ब्राझीलच्या या निर्णयाचा भविष्यातील साखर दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ब्राझीलने साखर उत्पादन कमी केले तर साखरेचे दर काही प्रमाणात वाढू शकतात, अशी स्थिती आहे. एप्रिलपासून सुरू झालेल्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात इथेनॉलकडे ब्राझीलचा ओढा दिसत आहे. येत्या एक दोन महिन्यात या देशाचे साखर निर्मितीबाबतचे आणखी धोरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत ब्राझीलमध्ये ब्राझीलमध्ये मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉल उत्पादनालाही वेग आला आहे. मक्यावरील इथेनॉल उत्पादन ४१ कोटी १९ लाख ४० हजार लिटरवर पोहोचले असून, त्यात १५.०६ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण इथेनॉल उत्पादनात मक्यावरील इथेनॉलचा वाटा ३३.४९ टक्के इतका राहिला आहे. तर ८७ कोटी ९८ लाख ७० हजार लिटर जलयुक्त (हायड्रस) इथेनॉलचा समावेश असून, त्यात १८.५४ टक्क्यांची वाढ झाली आहे. निर्जल (अनहायड्रस) इथेनॉलचे उत्पादन ३५ कोटी २ लाख लिटर इतके राहिले.


















